तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात व्हीआयपी दर्शन पास वाटपात मोठा गैरव्यवहार झाल्या ची तक्रार जयकुमार पांढरे यांनी मंदिर समितीला देऊन केला आहे. या तक्रारीची दखल घेत मंदिर संस्थान प्रशासनाने चौकशीचे आदेश दिल्याचे पत्र समोर आले आहे. अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल 56 लाख 83 हजार रुपयांचे व्हीआयपी पास नियमबाह्य पद्धतीने वाटप करून मंदिर संस्थानचे आर्थिक नुकसान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मंदिर संस्थानाच्या व्यवस्थापनाकडून लेखाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात, तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या मुद्द्यांची सखोल चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तक्रारीसोबत व्हीआयपी नोंदवहीच्या छायाप्रती व इतर कागदपत्रे जोडण्यात आल्याचेही पत्रात नमूद आहे.
मंदिरात सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असताना पास वाटपात अनियमितता झाल्याच्या आरोपामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. श्रद्धेच्या ठिकाणी पारदर्शकतेचा अभाव असल्यास त्याचा थेट परिणाम मंदिराच्या प्रतिमेवर होऊ शकतो, अशी भावना व्यक्त होत आहे. तक्रारीतील आरोप खरे ठरल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? व्हीआयपी पास कोणाला आणि कोणाच्या शिफारशीवर वाटप करण्यात आले? संस्थानचे नेमके किती नुकसान झाले? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.