धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या दीर्घकालीन विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई येथील ‌‘वर्षा' या शासकीय निवासस्थानी सविस्तर चर्चा झाली. रोजगार, उद्योग, जलव्यवस्थापन, ऊर्जा आणि शेती क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणाऱ्या या प्रस्तावांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका दर्शविल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव विमानतळ परिसरात देशातील पहिले मानवरहित हवाई वाहन (ड्रोन) संशोधन, उत्पादन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. विमानतळाची उपलब्ध जागा, भौगोलिक स्थिती आणि भविष्यातील क्षमता लक्षात घेता येथे ड्रोन तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन व विकास केंद्र उभारल्यास धाराशिव राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. कृषी, संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, सर्वेक्षण, वैद्यकीय सेवा आणि औद्योगिक क्षेत्रात ड्रोनच्या वाढत्या वापरामुळे या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, स्टार्टअप्सना संधी आणि औद्योगिक गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त करण्यात केली. याशिवाय दरवर्षी कोल्हापूर व सांगली परिसरातील अतिरिक्त पूरपाणी समुद्रात वाहून जाण्याऐवजी ते मराठवाड्याकडे वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. हा प्रकल्प मार्गी लागल्यास धाराशिवसह मराठवाड्यातील दुष्काळी भागांना मोठा दिलासा मिळणारआहे. शेती, उद्योग, पिण्याचे पाणी आणि भूजल पुनर्भरणासाठी हा प्रकल्प ‌‘गेमचेंजर' ठरणार असल्याचा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.आहे.


 
Top