धाराशिव (प्रतिनिधी)- बदलती जीवनशैली,वाढता ताणतणाव आणि विविध आजारांच्या पार्श्वभूमीवर शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.भारतीय संस्कृतीची ही अमूल्य देणगी आज जगभर स्वीकारली जात असून,निरोगी आणि संतुलित जीवनाचा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय योग दिन आज २१ जून रोजी रविवारी धाराशिवमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे,विद्यार्थी,खेळाडू,युवक- युवती,नागरिक आणि योग साधक- साधिका अशा विविध स्तरांतील सुमारे ७०० जणांनी एकत्रितपणे योगाभ्यास करत आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प केला.
जिल्हा प्रशासन,जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,आयुष विभाग आणि मेरा युवा भारत केंद्र यांच्या विद्यमाने तसेच पतंजली योग समिती,आर्ट ऑफ लिव्हिंग,धाराशिव डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व क्रीडा भारती यांच्या सहकार्याने सकाळी ७ वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथील स्केटिंग मैदानावर हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कवडकर,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी प्रवीण बागल, आंतरराष्ट्रीय खेळाडू गौरी शिंदे,खो-खो वर्ल्ड कप विजेती अश्विनी शिंदे,जिल्हा आयुष अधिकारी प्रिया सोनवणे,शिक्षण विस्तार अधिकारी भारत देवगुडे,क्रीडा भारतीचे प्रवीण गडदे,आर्ट ऑफ लिव्हिंगचे नंदकिशोर तांबडे तसेच डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सहसचिव योगेश थोरबोले यांचे स्वागत करून योग सत्रास प्रारंभ करण्यात आला.
यंदाच्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची (IDY २०२६) "निरोगी वृद्धत्वासाठी योग" (Yoga for Healthy Ageing) ही संकल्पना विशेष ठरली.वाढत्या वयातही शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी योग किती उपयुक्त आहे, याचा संदेश या संकल्पनेतून देण्यात आला.मैदानावर एकाच वेळी विविध वयोगटांतील नागरिकांनी योगाभ्यास करत या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीतून प्रतिसाद दिला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कवडकर यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी नियमित योगासने करण्याचे आवाहन केले."स्वतःचे आरोग्य डॉक्टरविरहित ठेवण्यासाठी दररोज योगासने करा,नियमित मैदानावर या आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा," असे सांगत त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले.तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विशद करून उपस्थितांकडून ध्यान-धारणा करून घेण्यात आली.
श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, स्केटिंग मैदान येथे पतंजली योग संस्थेचे राम ढेरे यांनी उपस्थितांकडून योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले.विविध योगासने, त्यांचे आरोग्यदायी फायदे आणि दैनंदिन जीवनात योगाचा समावेश कसा करावा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.मैदानावर उपस्थित शेकडो नागरिकांनी उत्साहाने त्यांच्या सूचनांचे पालन करत योगाभ्यास केला.
या कार्यक्रमास तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी व अक्षय बिरादार, क्रीडा मार्गदर्शक डिंपल ठाकरे व विश्वास खंदारे,मनपा शिक्षणाधिकारी मल्हारी माने,आकाशवाणीचे जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक,मेरा युवा भारत केंद्राचे वैभव लांडगे,पतंजली योग समितीच्या साधनाताई व वैशाली उपासे यांच्यासह सुमारे ७०० योग साधक-साधिका उपस्थित होते.
तसेच शहरातील शासकीय नर्सिंग महाविद्यालय,खोखो खेलो इंडिया सेंटरचे खेळाडू,कर्मवीर बालक मंदिरचे विद्यार्थी, नागरिक,युवक-युवती आणि खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात शेकडो नागरिकांनी एकत्रितपणे केलेला योगाभ्यास,मैदानावर उमटलेली सकारात्मक ऊर्जा आणि निरोगी जीवनाचा घेतलेला संकल्प यामुळे यंदाचा योग दिन विशेष संस्मरणीय ठरला. राम ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा मार्गदर्शक शुंभागी रोकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
