धाराशिव (प्रतिनिधी)- श्री सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा समिती, धाराशिव यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय प्रवचनमालेचा प्रारंभ अत्यंत भक्तिमय वातावरणात झाला. या प्रवचनमालेत ह.भ.प. श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांनी संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठातील दुसऱ्या अभंगावर प्रास्ताविकपर सखोल आणि चिंतनशील विवेचन केले.
प्रवचनाच्या प्रारंभी हरिनामाचे महत्त्व, संतपरंपरेतील हरिपाठाचे स्थान आणि संत एकनाथ महाराजांनी मांडलेला भक्तिमार्ग यांचे विवेचन करण्यात आले. हरिनाम हेच जीवनाचे खरे साधन असून नामस्मरणातून मनुष्याला आत्मिक समाधान, शांती आणि ईश्वरप्राप्तीचा मार्ग सापडतो, असे प्रतिपादन श्री चैतन्य महाराजांनी केले.
वारकरी संप्रदायात हरीपाठाचे महत्व अनन्यसाधारण आहे. माऊलींनी हरिपाठ लिहीत असताना जी भूमिका ठेवली तीच भूमिका नाथ महाराजांनी हरिपाठ लिहिताना ठेवली आहे. नाथ महाराजांच्या एकूणच साहित्याची उद्देश वेगवेगळे आहेत. नाथांचे भागवत जगत कल्याणासाठी आहे. संत जे बोलतात त्याचा श्रोता होता आले पाहिजे. संत जेवढे आपल्याला ओळखतात या जगात दुसरे कोणीही ओळखत नाही. तुम्हा आम्हाला सर्वसामान्य माणसाला कळावं हीच आज पर्यंत संतांची भूमिका राहिली आहे.
संत आपल्याला ऐका ऐका असे नेहमी म्हणतात. कारण ऐकण्यामधून बोध होतो. त्यातून ज्ञान प्राप्ती होते. बहुतेक संत वाङ्मयाची निर्मिती ही संवाद शैलीत आहे. गीता ,भागवत, ज्ञानेश्वरी इत्यादी सारखे ग्रंथ संवाद रूपानेच श्रोत्यांना व वाचकांना भेटतात. तुकारामाचे अभंग हेही त्याचे उत्तम उदाहरण. ज्ञान व ब्रह्मज्ञान घेण्यासाठी गुरूंकडे जावे. नाथांनी भागवत सांगितला परंतु त्याचा ऐकण्याचा अधिकार आपल्याला आहे का. श्रवणाचा अधिकार प्राप्त करून घेण्याचा अधिकार आपल्याला खरंच आहे का याचे चिंतन व्हायला हवे.
आपण तत्त्वज्ञानाच्या संज्ञा नाकारू शकतो परंतु संकल्पना नाकारू शकत नाही. तत्त्वज्ञानाविषयी अंतकरणात श्रद्धा असावी लागते. आपल्याला परमार्थ करायचा की प्रपंच करायचा याचा विचार प्रथम आपल्या अंतकरणात व्हायला पाहिजे. संसारातील दुःखाचे मूळ कारण अथवा शोध आपण घेत नसल्यामुळे आपण नेहमी दुखी होतो. म्हणून सामान्यांची परिस्थिती चांगली व्हावी. त्यांना सुखाने संसार व परमार्थही करता यावा यासाठी शुद्ध मनाने व्यक्तीने हरिपाठ वाचायला हवा. हरिपाठ हरिनाम साधन, साध्य, स्वरूप, व परिणाम या मुख्य घटकावर नाथांच्या हरीपाठाची निर्मिती झाली आहे. मानवी जीवनाची कृतार्थता आंधळ्या श्रद्धेने होत नाही. अभ्यासाला उपासनेची जोड व उपासनेला अभ्यासाची जोड असायला हवी. परमेश्वराने आपल्याला दिलेली अनमोल भेट म्हणजे बुद्धी होय. व्यक्ती दोन प्रकारचे आनंद घेतो एक म्हणजे बुद्धीचा आनंद व दुसरा म्हणजे भावनेचा आनंद. वारंवार केलेली कृती म्हणजे अभ्यास. भावनेने हरिपाठ म्हटला की तो भाव आनंद म्हटला जातो. ज्ञानेश्वरीचे पारायण हा भावजय आनंद आहे. तर कीर्तन आणि प्रवचन हे बुद्धिजन्य आनंद आहेत. नाथ महाराजांनी लिहिलेला हरिपाठ हा मालावृत्तात लिहिला आहे. काही मागील पदातील शब्द हे पुढील अभंगाच्या सुरुवातीस येतात . संत एकनाथ महाराजांच्या हरीपाठाचे सखोल चिंतन करण्याआधी हरी पाठाची पार्श्वभूमी यांचे तत्त्वचिंतन चैतन्य महाराज देगलूरकर यांनी प्रवचन मालेच्या पहिल्या दिवशी केले.
या प्रवचनमालेस धाराशिव शहरासह परिसरातील अनेक वारकरी, भाविक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील व परिसरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .