धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इतर सवलतधारक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नोंदणी प्रक्रियेत होत असलेल्या गैरसोयीबाबत रुपामाता फाऊंडेशनचे सचिव ॲड. अजित गुंड पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून धाराशिव जिल्ह्यातील नोंदणी केंद्रांवरील व्यवस्था आता सुरळीत करण्यात आली आहे.
एनसीएमसी कार्ड नोंदणीसाठी जिल्ह्यातील उपलब्ध केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर ॲड. अजित गुंड पाटील यांनी परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्याकडे निवेदन सादर करून ही बाब निदर्शनास आणून दिली होती.
या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यक येवते यांनी तत्काळ संबंधित यंत्रणा व एजन्सीशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर नोंदणी प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील एनसीएमसी नोंदणी केंद्रांवरील कामकाज पूर्वीपेक्षा अधिक सुरळीत सुरू असून नोंदणी प्रक्रियेलाही गती मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला असून सवलतधारक प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
जनहिताच्या प्रश्नावर तातडीने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही केल्याबद्दल ॲड. अजित गुंड पाटील यांनी पालकमंत्री ना. प्रतापजी सरनाईक तसेच त्यांच्या कार्यालयाचे आभार व्यक्त केले आहेत. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाने दाखविलेली तत्परता ही समाधानकारक असून भविष्यातही अशाच पद्धतीने लोकाभिमुख निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
