भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातून जाणाऱ्या म. टाकळी-पाटोदा-वारदवाडी राज्य मार्ग क्र. 62 वरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नवीन सिमेंट काँक्रीट नाल्यांच्या बांधकामाला अखेर शुक्रवारी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करत रस्त्यालगत झालेली अतिक्रमणे हटविल्याने रखडलेले नाल्याचे काम मार्गी लागले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील महिन्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण केलेल्या नागरिकांना नोटिसा बजावून स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अनेक ठिकाणी अतिक्रमण कायम असल्यामुळे नाल्याच्या कामाला सुरुवात करता आली नव्हती. त्यामुळे शुक्रवारी विभागाने प्रत्यक्ष कारवाई करत अतिक्रमणे हटविली आणि त्यानंतर गोलाई चौक ते बाभळवन या टप्प्यात सिमेंट काँक्रीट नाल्याच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला.

भूम शहरातील हा मुख्य मार्ग अरुंद असल्याने दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे येथे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. विशेषतः मोठी वाहने, शालेय बस, मालवाहू वाहने आणि दुचाकींची गर्दी झाल्यास रस्ता जाम होण्याचे प्रकार घडत होते. रस्त्याच्या कडेला झालेली अतिक्रमणे आणि अनियोजित बांधकामांमुळे पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता.

नवीन नाल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची उपलब्ध रुंदी वाढण्यास मदत होणार असून पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच वाहतुकीचा वेग वाढून नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवास करता येणार आहे. या कारवाईदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अतिक्रमण हटविण्याची मोहीम टप्प्याटप्प्याने सुरू ठेवून उर्वरित भागातील नाल्याचे कामही लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

 
Top