तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी (दि. 25) सहकुटुंब तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे येऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. 

विनाअट सरसकट कर्जमाफीचा शब्द देऊनही तो न पाळता अन्नदात्याची फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात ‌‘एल्गार अन्नदात्याचा' या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत आम्ही रस्त्यावरचा संघर्ष सुरु केला आहे. त्यासाठी आज साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापुरच्या आई भवानीमातेची सहकुटुंब पूजा-आरती, अभिषेक करुन ओटी भरली आणि अन्नदात्याला फसवणाऱ्या या विश्वासघाती सरकारविरोधात संघर्ष करण्याची शक्ती दे, विनाअट सरसकट कर्जमाफी करण्याची सरकारला सद्बुद्धी दे आणि राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना आई भवानीमातेच्या चरणी केल्याचे रोहित पवारांनी सांगितले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, शहराध्यक्ष अमर चोपदार, शिवाजी कसबे, गणेश जगदाळे सह  राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री तुळजाभवानी दर्शनानंतर भवानी रोडवरील एका टपरीवर कार्यकर्त्याच्या आग्रहाखातील टपरीवर बसून चहाचा आस्वाद घेतला. तसेच मंदिर परिसरातील श्री गणेशाची, भवानीशंकर आणि मातंगीदेवी, उपदेवताचे दर्शन घेतले. 

विशेष म्हणजे, रोहित पवार यांनी आपले वाहन भवानी रोडवरील लोखंडी गेटजवळ उभे करून तेथून कार्यकर्त्यांसह पायी चालत मंदिराकडे प्रस्थान केले. अनेकदा लोकप्रतिनिधींची वाहने मंदिराच्या महाद्वारापर्यंत जात असल्याची चर्चा असताना रोहित पवार यांनी सर्वसामान्य भाविकांप्रमाणे मंदिरात प्रवेश केल्याने त्यांच्या साधेपणाची चर्चा भाविकांमध्ये रंगली.


 
Top