धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव: धाराशिव शहरातील भानूनगर परिसरातील एका ऑटोमोबाईल दुकानात किरकोळ कारणावरून एका 30 वर्षीय तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणाला काहीही कारण नसताना जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि धारदार कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि खुनाचा प्रयत्न सदृश कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शांतीराम नंदू लोंढ, रा. अमृत नगर, धाराशिव हे रविवारी दि.21 जून 2026 रात्री भानूनगर येथील ‘शिनगार ऑटो मोबाईल' दुकानात काही कामानिमित्त गेले होते. यादरम्यान तिथे आलेल्या दोन तरुणांनी कोणतीही पूर्ववैमनस्य किंवा कारण नसताना शांतीराम यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. सर्वांसमोर त्यांचा अपमान करण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्यांना अत्यंत हीन दर्जाची जातीवाचक शिवीगाळ केली.
वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर संतापलेल्या दोन्ही आरोपींनी शांतीराम यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यातील एकाने सोबत आणलेला धारदार लोखंडी कोयता काढून शांतीराम यांच्यावर सपासप वार केले. शांतीराम लोंढे त्यांनी 22 जून 2026 रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून पोलिसांनी गालिब नगरमधील दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल शेख आणि आदनान शेख (दोघे रा. गालिब नगर, धाराशिव) या आरोपींवर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम 3(1)(आर)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.