धाराशिव (प्रतिनिधी)- जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर भामट्यांचा आणखी एक मोठा गुन्हा धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. एका बनावट मोबाईल ॲपच्या माध्यमातून ‘एआय ट्रेड' कंपनीच्या मालकांनी तुळजापूर तालुक्यातील एका व्यक्तीची तब्बल 63 लाख 65 हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्राम यशवंत साखरे वर्षे, रा. उमरगा चि., ता. तुळजापूर, जि. धाराशिव यांना आरोपींनी त्यांच्या ‘एआय ट्रेड' या कंपनीत गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी एक बनावट मोबाईल ॲप तयार केले होते. 14 नोव्हेंबर 2025 ते 17 नोव्हेंबर 2025 या अवघ्या तीन ते चार दिवसांच्या कालावधीत, आरोपींनी नळदुर्ग येथे नेट बँकिंगचा वापर करायला लावून फिर्यादी सिद्राम साखरे यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर ऑनलाईन पद्धतीने एकूण 63, लाख65,000 रुपये ट्रान्सफर करण्यास लावून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी सायबर तपासाअंती पीडित सिद्राम साखरे यांनी 22 जून 2026 रोजी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून पोलिसांनी संशयित मुख्य सूत्रधारांवर गुन्हा दाखल केला आहे. गणेशराव रमेश गोपाळे, शांतनु रमेश गोपाळे (दोघे रा. बोरगाव नांदूर, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर जुने अहमदनगर) (दोघेही ‘एआय ट्रेड' कंपनीचे मालक आहेत). सायबर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 320, 321, 335, 336, 340 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (सी) आणि 66 (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. कोट्यवधी रुपयांच्या या ऑनलाईन फसवणुकीचा पुढील तपास सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहे.