धाराशिव (प्रतिनिधी)- पाच वर्षांखालील बालकांमधील अतिसार (डायरिया) आजारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात दि.16 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत ‌‘स्टॉप डायरिया अभियान-2026' प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत अतिसार प्रतिबंध,वेळेवर उपचार आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे.‌‘अतिसारावर करा मात, स्वच्छता व ओआरएसची घेऊनी साथ' हे अभियानाचे घोषवाक्य असून त्याद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छता,सुरक्षित पिण्याचे पाणी आणि बालआरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे,ग्रामीण रुग्णालये,अंगणवाडी केंद्रे तसेच आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.अतिसार झालेल्या प्रत्येक बालकाला तात्काळ ओआरएस द्रावण आणि झिंक गोळ्या उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांचा योग्य वापर कसा करावा, याबाबत पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 1 लाख 69 हजार 812 बालकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.त्यासाठी 5 हजार 815 आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी तसेच विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व अधिकारी आणि कर्मचारी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहभागी होणार आहेत.अतिसार झाल्यास बालकाला भरपूर द्रवपदार्थ,ओआरएस द्रावण तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झिंक गोळ्या देणे आवश्यक आहे. यासोबतच स्तनपान सुरू ठेवावे आणि बालकात निर्जलीकरणाची लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य केंद्रात दाखल करावे,असे आवाहन जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनीही नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, पाच वर्षांखालील बालकांचे अतिसारापासून संरक्षण करण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर करणे आणि ‌‘स्टॉप डायरिया अभियानात' सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाने या मोहिमेला सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top