धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या सात वर्षांपासून 33 के.व्ही. सब स्टेशन मंजूर केले आहे. मात्र ते काम अद्याप पर्यंत सुरू केलेले नाही. त्यामुळे विद्युत तार कोसळून दोन मशीन ठार झाल्या तर परिसरातील शेतकऱ्यांना विजे अभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. पारधी व दलित वस्ती या भागात अद्याप पर्यंत त विद्युत कलेक्शन नसल्यामुळे या वस्त्या अंधारात आहेत. त्यामुळे भूम तालुक्यातील गिरवली येथे मंजूर असलेले 33 के.व्ही. सबस्टेशन तात्काळ बसवून सुरू करावी या मागणीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर ग्रामस्थांनी दि.23 जून रोजी थेट गाढव मोर्चा काढला. दरम्यान, मोर्चेकऱ्यांना  महिन्याभरात मागण्याची पूर्तता केली जाईल असे लेखी आश्वासन अभियंत्यांनी दिले आहे.

भूम तालुक्यातील गिरवली येथे 33 के.व्ही. सबस्टेशन गेल्या सात वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेले आहे. मात्र, त्यासाठी जागा नाही या शुल्लक कारणावरून ते सबस्टेशन उभा करण्यास टाळाटाळ करत आहेत. जागा देखील उपलब्ध करून दिली असून अधिकारी खरेदी करण्यासाठी अक्षय दिरंगाई व टोलवावाटवी करत आहेत. तर डोकेवाडी येथील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीसाठी स्वतंत्र नवीन ट्रांसफार्मर बसविण्यात यावे, गिरवली येथे मंजूर असलेले सिंगल फेज बिपीन मोटे वस्ती, सातपुते वस्ती, वडर वस्ती येथील कामे तत्काळ सुरू करावीत. तसेच सोन्नेवाडी येथे तात्काळ सिंगल फेज रोहित्र बसवावे, ओव्हरलोड नवीन 3 ट्रान्सफॉर्मर मंजूर करावेत. तर गिरवली येथे 2 ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड असलेले तीन ट्रान्सफर नवीन मंजूर करण्यात यावेत. त्याबरोबरच डोकेवाडी येथे तानाजी जालन यांच्या येथे ओव्हरलोड असलेली 100 एचपी ट्रांसफार्मर मंजूर करण्यात यावी. झोडगे वस्ती व वडर वस्ती येथे 25 एचपीची सिंगल फेज ची डीपी बसवावी. मागासवर्गीय वस्ती 25 एचपी, माजी सैनिक गोरख डोके व देविदास खैरे, लक्ष्मण दिवटे यांच्या शेतात 100 एचपी डीपी मंजूर करावेत. तर महाडिक वस्ती अंजनसोडा येथे व झेंडेवाडी गावठाणात तसेच अभिजीत हुंबे यांच्या घरासमोर पांढरेवाडी नीट रस्त्यावर 25 एचपी डिपी मंजूर करण्यात यावेत अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी वारंवार मागणी निवेदने करून देखील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे यापूर्वी देखील रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी तात्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत कुठलीही प्रक्रिया पार पाडलेली नाही. त्यामुळे वैतागून गेलेल्या शेतकरी व गावकऱ्यांनी धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक गाढव मोर्चा काढला. या मोर्चामुळे शहरातील वाहतूक एक तासभर विस्कळीत झाली होती.  या आंदोलनात पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे, भूम येथील खरेदी विक्री संचालक रवींद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य शहाजी सोन्ने, प्रकाश कोल्हे, लक्ष्मण चव्हाण, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब मोटे यांच्यासह अंजनसोडा व ईट येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top