धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ होऊन संतुलित लिंग गुणोत्तर राखले जावे तसेच गर्भलिंग निदानास प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या उद्देशाने पीसीपीएनडीटी  कायद्यांतर्गत धाराशिव जिल्हा सल्लागार समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. नवनियुक्त सदस्यांची पहिली बैठक मंगळवारी दि.23 जून रोजी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात सकारात्मक वाढ घडवून आणण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती सातत्याने कार्यरत असून समितीची नियमितपणे दर दोन महिन्यांनी बैठक आयोजित केली जाते.या बैठकीत जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रे व वैद्यकीय गर्भपात केंद्रांची (एमटीपी सेंटर) तपासणी, नवीन सोनोग्राफी केंद्रांना मान्यता देणे,परवान्यांचे नूतनीकरण, स्थळबदल प्रस्तावांवर निर्णय घेणे, न्यायप्रविष्ट प्रकरणांचा आढावा घेणे तसेच डिकॉय प्रकरणांचे परीक्षण करणे आदी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येते.तसेच पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय करण्यात येतो.

समितीमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून त्यात वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ,जिल्हा शासकीय अभियोक्ता,जिल्हा माहिती अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग आहे. समितीच्या सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षांचा असतो.

सद्यस्थितीत समितीवर वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.स्मिता गवळी-सरोदे व डॉ. सुजित नायकल,बालरोग तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय खुणे,जिल्हा शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून डॉ.स्मिता शहापूरकर,करुणाबाई यादव आणि सौ.ललिता लिंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैठकीस या सदस्यांसह आयएमएचे अध्यक्ष डॉ.महेश कानडे आणि फॉगसीचे अध्यक्ष डॉ.आदिनाथ राजगुरू उपस्थित होते.

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी,गर्भलिंग निदानास प्रतिबंध तसेच ‌‘बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाच्या उद्दिष्टांची यशस्वी पूर्तता करण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.भविष्यातही समितीमार्फत विविध जनजागृती व नियंत्रणात्मक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक तथा जिल्हा समुचित प्राधिकारी (पीसीपीएनडीटी) सदस्य डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले.

 
Top