धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धावत्या वाहनावर चढून, ताडपत्री फाडून चोरी करणाऱ्या एका अट्टल चोराला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या  पथकाने शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून 1 लाख 23 हजार 392 रुपये किमतीच्या विदेशी दारूचे 9 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे महामार्गावर धावत्या गाड्या लुटणाऱ्या टोळीचा माग काढण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

21 जून 2026 रोजी येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सोलापूर-धुळे महामार्गावरून एक आयशर टेम्पो जात असताना चोरट्यांनी  चालत्या गाडीवर चढून, गाडीची ताडपत्री फाडली होती आणि आतील मौल्यवान साहित्य चोरून नेले होते. या धाडसी चोरीप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्रमांक 247/26, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा गंभीर व संवेदनशील असल्याने पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे थेट आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कासार व त्यांच्या पथकाने तात्काळ तपासचक्र फिरवले. 22 जून 2026 रोजी पथकाला गोपनीय बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, या चोरीतील एक संशयित तेरखेडा परिसरात आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संतोष राजेंद्र शिंदे रा. लक्ष्मी पारधी पेढी, तेरखेडा, ता. वाशी याला शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपी संतोष शिंदे याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने महामार्गावरील आयशर टेम्पोतून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला ‌‘ओकस्मिथ व्हिस्की'चा  एकूण 1 लाख 23 हजार 392 रुपये किमतीचा 9 बॉक्स साठा पंचांसमक्ष जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्याचे इतर साथीदार कोण होते, याचा तपास आता सुरू आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, सपोनि अमोल मोरे, पोलीस अंमलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, प्रदीप वाघमारे, फरहान पठाण, महिला पोलीस अंमलदार शोभा बांगर, चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे.

 
Top