धाराशिव (प्रतिनिधी)- महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी व वस्तुनिष्ठ माहिती देण्यासाठी आजपासून उपविभागनिहाय ग्राहक समाधान मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये ग्राहकांना स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, त्याचे फायदे तसेच वीज वापराचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे कसे करता येते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
तूळजापूर विभागांतर्गत तूळजापूर उपविभाग व लोहारा उपविभागात मंगळवारी (दि.16 जून) सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेदरम्यान स्मार्ट मीटर संदर्भात ग्राहक समाधान मेळावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर तूळजापूर विभागांतर्गत येणाऱ्या उमरगा उपविभाग व नळदुर्ग उपविभागात बुधवारी (दि.17 जून ) सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेदरम्यान स्मार्ट मीटर संदर्भात ग्राहक समाधान मेळावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर कळंब, भूम, व परंडा उपविभाग येथे बुधवारी (दि.17 जून) सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेदरम्यान, धाराशिव विभागातील धाराशिव शहर उपविभागात गुरुवार (दि.18 जून) व ग्रामीण, तेर व वाशी उपविभागात शुक्रवारी (दि.19 जून), स्मार्ट मीटर संदर्भात ग्राहक समाधान मेळावा घेण्यात येणार आहे.
महावितरणच्या वतीने सांगण्यात आले की, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती रिअल-टाईममध्ये उपलब्ध होते. त्यामुळे वीज वापरावर नियंत्रण ठेवणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि ऊर्जाबचत करणे अधिक सुलभ होते. तसेच मीटर रीडिंगसाठी प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता राहत नसल्याने बिलिंग प्रक्रिया अधिक अचूक व पारदर्शक बनते.
स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज वापर, बिलाची स्थिती, देय तारखा आणि इतर महत्त्वाच्या सूचना मोबाईलद्वारे तत्काळ मिळू शकतात. मीटरमध्ये छेडछाड झाल्यास त्याची माहिती त्वरित उपलब्ध होत असल्याने वीज वितरण व्यवस्थेची सुरक्षितता वाढण्यास मदत होते.
ग्राहक समाधान मेळाव्यांमध्ये उपस्थित अधिकारी व तंत्रज्ञ नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन करणार असून स्मार्ट मीटरविषयी पसरलेल्या गैरसमजांवरही वस्तुनिष्ठ माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे ग्राहक आणि महावितरण यांच्यातील संवाद अधिक मजबूत होऊन डिजिटल व पारदर्शक वीज सेवेला चालना मिळेल, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे. महावितरणने सर्व ग्राहकांना संबंधित उपविभाग स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या ग्राहक समाधान मेळाव्यांना उपस्थित राहून स्मार्ट मीटरबाबत प्रत्यक्ष माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.