तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक तुळजापूर येथे येत असतात. मंदिर परिसरातील सुरक्षितता, भाविकांची सुविधा आणि वाहतूक व्यवस्थापन या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असून त्या अनुषंगाने विविध विभागांमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत असतात. त्यामुळे वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण राहण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा.
दीपक चौक ते महाद्वार मार्गावरील लोखंडी गेट येथून होणारी वाहतूक ही मंदिर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील बाब आहे. या मार्गावरील वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण राहावे, तसेच कायमस्वरूपी पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी आणि वाहन प्रवेश परवान्याबाबत योग्य नियमन करण्यात यावे, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून यापूर्वीच पोलिस प्रशासनास लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे. हा विषय पोलिस प्रशासनाच्या आख्यातरीत असुन या मार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात पुन्हा एकदा मंदिर संस्थानच्या वतीने पोलिस प्रशासनास कळविण्यात आले आहे.
दीपक चौक ते महाद्वार परिसरापर्यंत सोडण्यात येणाऱ्या वाहनांबाबतचे निर्णय, नियंत्रण आणि अंमलबजावणी ही पोलिस विभागाच्या कार्यक्षेत्रातील बाब असून त्यासंदर्भातील सर्व अधिकार संबंधित पोलिस प्रशासनाकडे आहेत.