धाराशिव (प्रतिनिधी)- इनोव्हेटिव्ह जॅगरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या वतीने संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड. व्यंकट गुंड पाटील यांनी महाराष्ट्राचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांची लातूर येथे भेट घेऊन गुळ पावडर उद्योगासमोरील विविध समस्या, उद्योगाला भेडसावणाऱ्या अडचणी तसेच उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी ॲड. व्यंकट गुंड पाटील यांनी गुळ पावडर उद्योगासंदर्भातील एफआरपी विषयक मुद्दे, उद्योगाला आवश्यक असलेले धोरणात्मक पाठबळ, तसेच इथेनॉल निर्मितीसाठी गुळ पावडर कारखान्यांना आवश्यक परवाने देण्याची मागणी सहकार मंत्र्यांकडे आग्रहीपणे मांडली. उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मागण्यांचे निवेदनही यावेळी सादर करण्यात आले.
या प्रसंगी आ. विक्रम काळे, भाजपा सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य सहकारी शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, साहेबराव पाटील, उद्योजक व्ही. पी. पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने मांडण्यात आलेल्या मागण्या व उद्योगासमोरील अडचणींची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली. गुळ पावडर उद्योग हा शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित महत्त्वाचा उद्योग असून त्याच्या प्रगतीसाठी शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मांडण्यात आलेल्या विषयांवर संबंधित विभागांशी चर्चा करून लवकरच अनुकूल निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
गुळ पावडर उद्योगाच्या विकासाला चालना देण्यासाठी, उद्योगातील अडथळे दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अधिक लाभदायी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी झालेली ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उद्योगाशी संबंधित अनेक प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
