तुळजापूर (प्रतिनिधी)-  मोहरमनंतरची सुट्टी तसेच शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सोमवारी वटपोर्णिमा असल्याने व नंतर देवीचा वार मंगळवार असल्याने भाविकांचा हा अवघा असाच बुधवारपर्यंत राहणार आहे. 

मंदिर परिसरात चालू असलेल्या विकास कामांमुळे मंदिरातील कमी जागा उपलब्ध होत असल्याने  सशुल्क दर्शन धर्मदर्शन मुखदर्शन  भाविकांना बिडकर पायऱ्या मार्गे दर्शनासाठी सोडण्यात येत असून वाढत्या गर्दीच्या तुलनेत दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दर्शन व्यवस्थेत तुलनेने समानता राखल्याने अनेक भाविकांनी मंदिर प्रशासनाचे सुलभ दर्शनाबद्दल आभार मानले.

मात्र, चोपदार दरवाजा परिसरात अनावश्यक व्यक्ती तसेच काही ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांची गर्दी होत असल्याने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार भाविकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणची गर्दी कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यापूर्वी मंदिरातील सशुल्क दर्शन रांगा व मुखदर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याच्या तक्रारी होत्या. गर्दीच्या दिवशी यामधून लाखो रुपयांची अनधिकृत उलाढाल होत असल्याचेही बोलले जात होते. मात्र अलीकडील उपाययोजनांमुळे तसेच मुखदर्शनाच्या नावाखाली पैसे घेऊन थेट प्रवेश मिळवून देण्याच्या प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत भाविकांची सर्वाधिक गर्दी होत असल्याने पहाटे चार वाजल्यापासून दर्शन रांगा अधिक वेगाने पुढे सरकविण्याची मागणी भाविकांनी केली आहे. त्यामुळे सकाळच्या गर्दीवर नियंत्रण मिळवून कमी वेळेत दर्शन घडविणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच महाद्वार मधून भाविकांना  प्रदक्षिणा मार्गावरून कळस व होमकुंड दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी पुढे आली आहे. अनेक  भाविकांना दीर्घकाळ रांगेत उभे राहणे शक्य नसल्याने ते प्रदक्षिणा मार्गावरून कळस व होमकुंड दर्शन घेऊन समाधान मानतात. त्यामुळे भाविकांच्या सुविधेसाठी या पर्यायाचाही मंदिर प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 
Top