धाराशिव (प्रतिनिधी)- टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रमुखांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यानुसार शिक्षक पदासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाच वर्षांपेक्षा अधिक सेवा शिल्लक असलेल्या कार्यरत शिक्षकांनाही टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो भावी व कार्यरत शिक्षक या परीक्षेच्या कक्षेत आले असून, 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. मात्र, परीक्षेच्या आदल्या दिवशीच पेपर फुटीचे प्रकरण समोर आल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली. या घटनेमुळे लाखो परीक्षार्थींच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले असून, राज्यातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमागे जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने यंत्रणा बेफिकीर बनल्याची टीकाही करण्यात आली आहे.
टीईटी पेपरफुटीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि शालेय शिक्षण विभाग जबाबदार असल्याचा आरोप करत, परीक्षा परिषद प्रमुखांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी शेरखाने यांनी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई झाल्यास भविष्यात अशा घटनांना आळा बसेल आणि परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनाच्या प्रती शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, संबंधित लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.