धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश देणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने सामाजिक न्याय दिन तसेच आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व तस्करी विरोधी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले होते.

प्रमुख वक्ते म्हणून प्रेरणादायी वक्ते भैरवनाथ कानडे आणि डॉ.संदीप तांबारे यांनी मार्गदर्शन केले.तसेच दिव्यांग कल्याण आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक सचिन बांगर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त काशिनाथ खुणे,विजयकुमार गायकवाड आणि ॲड.बडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रास्ताविकात अध्यक्ष सचिन कवले यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की,सामाजिक न्यायाची संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष शासन व्यवस्थेत रुजविली.शिक्षण,आरक्षण, शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या माध्यमातून वंचित समाजघटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श प्रत्येकाने आचरणात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ‌‘राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक विचार आणि सामाजिक न्याय' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते भैरवनाथ कानडे यांनी शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे सर्वाधिक प्रभावी साधन असल्याचे सांगितले.

राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाच्या माध्यमातून समता,स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाची व्यापक चळवळ उभी केली.वसतिगृहे,शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण आणि आरक्षणाच्या धोरणांद्वारे त्यांनी वंचित समाजाला नवी दिशा दिली. आजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत संविधानिक मूल्ये,सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा विचार आत्मसात करून समाजपरिवर्तनाचे वाहक बनावे,असे आवाहन त्यांनी केले.

आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व तस्करी विरोधी दिनानिमित्त युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देताना डॉ.संदीप तांबारे म्हणाले की,मादक पदार्थांचे व्यसन हे व्यक्ती,कुटुंब आणि समाजासाठी घातक आहे.युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण,आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा.व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी व्यापक जनजागृती आणि सामूहिक सहभागाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले,तर आभार प्रदर्शन युवराज चव्हाण यांनी मानले. राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर करताना विद्यार्थ्यांचा गौरव आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


 
Top