धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरातील पदवी पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. तसेच विद्यार्थी, पालक, आणि शिक्षणप्रेमी नागरिकांसाठी शुक्रवार दिनांक 19 जुन 2026 रोजी प्रशासकीय ईमारतीमधील सभागृहात ' 'एज्युकेशन एक्स्पो' आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. कुलगुरु प्रा. डॉ. विजय फुलारी, प्र- कुलगुरु प्रा. डॉ. प्रवीण वक्ते, आणि कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी सांगितले.
विद्यापीठ उपपरिसरात प्रशासकीय ईमारतीमधील सभागृहात 'एज्युकेशन एक्स्पो' होणार आहे. विद्यापीठ उपपरिसरातील 10 शैक्षणिक विभागांचे स्टॉल्स लागणार आहेत. विभागात सुरु असलेले अभ्यासक्रम, नौकरी, रोजगाराच्या संधी, या बाबत माहिती येथे दिली जाणार आहे. विद्यापीठ उपपरिसरातील इंग्रजी, शिक्षणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जल व भूमी व्यवस्थापन, व्यवस्थापनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि नाट्यशास्त्र व लोककला यांचे स्टॉल्स असणार आहेत. शुक्रवार, 19 जुन रोजी सकाळी 11 ते 6 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. विद्यापीठ उपपरिसरातील सर्व अभ्यासक्रम, प्रवेशासाठी अर्हता, शुल्क, या संदर्भात विस्तृत माहिती पुस्तिकेत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या अंतर्गत विद्यापीठ उपपरिसरातील सर्व स्टॉल्सना विद्यार्थी, पालक, शिक्षण प्रेमी नागरिक यांना भेटी देता येणार आहेत. या सर्वांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.