मुंबई (प्रतिनिधी)-  परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार आणि तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यभरातील बसस्थानकांच्या 200 मीटर परिघातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले असून त्याचा थेट सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर दिसून आला आहे.

1 जून ते 15 जून 2026 या कालावधीत एसटी महामंडळाचे एकूण वाहतूक उत्पन्न 495,कोटी 34 लाख रुपये इतके झाले असून, मागील वर्षीच्या याच कालावधीतील 451, कोटी 51 लाख रुपयांच्या तुलनेत 43 कोटी 83 लाख रुपयांची (9.71 टक्के) वाढ नोंदविण्यात आली आहे.म्हणजे दररोज चे सरासरी उत्पन्न 3 कोटी रुपयांनी वाढले आहे. या कालावधीत रायगड (2 कोटी 17 लाख),पुणे (5 कोटी 97 लाख), सातारा (3 कोटी 46 लाख),छत्रपती संभाजीनगर (2 कोटी 66 लाख), अमरावती (1 कोटी 60 लाख)  नांदेड (2 कोटी 27 लाख) या विभागांनी सर्वाधिक उत्पन्नवाढ नोंदवली.

 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की,बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या प्रवासी संख्येवर आणि महसुलावर मोठा परिणाम होत होता.न्यायालयाच्या आदेशानुसार बसस्थानकापासून 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. परिवहन विभाग,प्रादेशिक परिवहन कार्यालय,पोलीस आणि एसटी प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईमुळे प्रवाशांचा एसटीकडे ओढा वाढला असून त्याचे प्रतिबिंब उत्पन्नवाढीत स्पष्टपणे दिसून येत आहे. श्री.सरनाईक यांनी पुढे सांगितले की,राज्यातील प्रत्येक बसस्थानक परिसर अवैध प्रवासी वाहतुकीपासून मुक्त करण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील. प्रवाशांना सुरक्षित,विश्वासार्ह आणि कायदेशीर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे.

 
Top