धाराशिव (प्रतिनिधी)- रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर तब्ब्ल 2 महिने उपचार घेऊन प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देऊनही त्या रुग्णाने तब्बल 1 महिने वैद्यकीय कक्ष सोडला नाही उलट डॉक्टर व कर्मचारी यांना धमकावले व कामात अडथळा आणला. त्या रुग्णाला पोलिसांनी बाहेर काढत त्याच्यावर गुन्हा नोंद केला. पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिनेश जाधव हे तपास करीत आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समाजसेवा अधीक्षक सचिन राजेंद्र सातदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम विरुध्द कलम 132,329(3), 296,351(2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास व आरोपीचा शोध सुरु आहे. धाराशिव शहरातील देशपांडे स्टॅन्ड भागात राहणाऱ्या दत्ता वसंत ताकपीरे याला 28 मार्च 2026 रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर नियमानुसार 21 मे 26 रोजी रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आली तरी सुद्धा दत्ता याने रुग्णालयातील कक्ष सोडले नाही, जाण्यास नकार देऊन रुग्णालय कक्षात अनधिकृतरीत्या वास्तव्य केले. रुग्णास सुट्टी व जाण्यासाठी सांगीतले असता रुग्ण कक्षात कार्यरत असणाऱ्या परीचारीकांना व डॉक्टरांना तुम्ही मला सुट्टी करुच कसे शकता? तुम्ही मला सुट्टी देवूनच दाखवा मग मी तुम्हाला बघतो अशा प्रकारच्या धमक्या दिल्या.