विभागीय सुसंवाद -२०२६ महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल), मुंबई  यांच्यावतीने कार्यक्रमाचे  आयोजन (या संवाद कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक यांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद )
धाराशिव, दि. ५ जून २०२६ : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल), मुंबई व तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे ‘विभागीय सुसंवाद २०२६’ या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. नानासाहेब फटांगरे (ग्रुप ए), सिद्धेश्वर नर (वैद्यकीय प्रवेश), कुणाल देवकर (तांत्रिक प्रवेश), शार्दुल कदम (फाईन आर्ट), तसेच प्रमोद झरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने आणि इव्हेंट मॅनेजर प्रशांत गजरकर उपस्थित होते.

यावेळी प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महाविद्यालयात सेमिनार हॉलसह तीन कक्ष उपलब्ध करण्यात आले होते. तसेच कार्यक्रमास उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थी-पालकांसाठी युट्यूब च्या माध्यमातून लाइव्ह व्हिडिओ लिंक देण्यात आली होती.

श्री. नानासाहेब फटांगरे यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती देताना प्रवेशाच्या तीन फेऱ्या, आवश्यक कागदपत्रे व अर्ज भरण्याची पद्धत स्पष्ट केली. तसेच महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील ४० जिल्ह्यांत सुरू असलेल्या ३६ विद्यार्थी सहाय्यता केंद्रां विषयी माहिती देत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे, मोबाईल व लॅपटॉपसह या केंद्रांना भेट देऊन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन केले.

श्री. सिद्धेश्वर नर यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत अत्यंत दक्षता बाळगण्याचे आवाहन केले. खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील फी व अर्ज भरताना होणाऱ्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचा नंबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ऐवजी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाला लागू शकतो, याबाबत त्यांनी सचोटीने मार्गदर्शन केले.

तसेच कुणाल देवकर, शार्दुल कदम व प्रमोद झरकर यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला (Arts) व इतर उच्च शिक्षण शाखांबाबत करिअरच्या संधी व प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रकाश टाकला.

या मार्गदर्शन सत्रात विद्यार्थी-पालकांना परसेंटेज आणि परसेंटाइल यातील फरक, लेटरल एन्ट्री व वर्किंग प्रोफेशन सुविधा, तसेच चॉईस कोड निवडताना महाविद्यालयाच्या नामसाधर्म्यामुळे होणाऱ्या अडचणीबाबतही विशेष माहिती देण्यात आली.

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात एमएसटीसीईटी सेल, मुंबईच्या वतीने सुरू असलेल्या एक्सटेंशन सेंटर व एफसी सेंटरचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही मार्गदर्शकांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या भागातील विद्यार्थ्यांना सदैव मदत करण्याचा विश्वास दिला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थी व पालकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी तसेच जिल्हाभरातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शनपर सत्रामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत स्पष्टता मिळाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल), मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रम आयोजनाचे कौतुक करण्यात आले.
 
Top