तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये कोट्यवधी रुपयांचा विकास होत असल्याचे दावे केले जात असताना शहरातील प्रमुख तुळजापूर-धाराशिव महामार्गावर पाऊस पडताच महामार्ग रस्त्यावर पाणी साचत असल्याने विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बसस्थानक ते जगदाळे प्लॉटिंग या मार्गावर पाऊस पडताच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात सातत्याने पाणी साचत असून भाविक, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक या मार्गाचा वापर करतात. मात्र अवघ्या काही मिनिटांच्या पावसानंतर महामार्ग जलमय होत असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताचा धोका वाढत असून दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे.
याच मार्गावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या चारचाकी व अवजड वाहनांमुळे साचलेल्या पाण्याचे मोठे फवारे रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याने दरवर्षी हीच समस्या उद्भवते. पाणी तासन्तास साचून राहत असल्याने याचा फटका वाहन चालक महामार्गावरून जाणारे प्रवासी भाविकांना बसत आहे . महामार्ग विभागाने तातडीने या मार्गाची पाहणी करून पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्यासाठी आवश्यक गटारे, जलवाहिन्या आणि अन्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाविक, वाहनचालक आणि तुळजापूरकरांकडून जोर धरत आहे. “तीर्थक्षेत्रात भाविकांचे स्वागत फुलांनी व्हावे, पाण्याच्या फवाऱ्यांनी नव्हे,“ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
