धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या ऊसाची हक्काची एफआरपी न देणाऱ्या 3 साखर कारखान्यांवर साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी महसूल वसुली प्रमाणपत्र अंतर्गत जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या कारखान्यांची मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करण्याचे आदेश धाराशिव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील विठ्ठल साई व गोकुळ शुगर या 2 कारखान्याचा यात समावेश आहे. गोकुळ शुगरने शेतकऱ्याची काही देणी द्यायला 29 जुन पासुन सुरुवात केली आहे. आमदार बसवराज पाटील हे विठ्ठल साईचे चेअरमन असुन कारखान्याला अश्या कारवाईला प्रथमच सामोरे जावे लागत आहे.

विठ्ठल साई शुगर फॅक्टरी, मुरूम धाराशिव या कारखान्याने शेतकऱ्यांचे 10 कोटी 76 लाख रुपये एफआरपी थकीत आहे. कमलाभवानी शुगर फॅक्टरी, सोलापूर शेतकऱ्यांचे 19 कोटी एफआरपी थकीत आहेत तर अष्टलक्ष्मी शुगर, नाशिक यांचे 2 कोटी 62 लाख शेतकऱ्याची देणी थकीत आहेत. या 3 कारखान्यांसह एकूण 10 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई सुरू असून, त्याद्वारे शेतकऱ्यांचे एकूण 255 कोटी वसूल करून दिले जाणार आहेत.

धाराशिवच्या ‌‘विठ्ठलसाई' ने शेतकऱ्यांना 65.47 कोटी रुपये एफआरपीपोटी वाटले परंतु एकूण केलेले 3 लाख 14 हजार 755 टनाचे गाळप बघता शेतकऱ्यांना 10 कोटी 76 लाख रुपये थकविल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी साखर आयुक्तालयात झालेल्या सुनावणीत ‌‘विठ्ठलसाई'च्या प्रशासनाला समाधानकारक माहिती देता आली नाही. त्यामुळे कारखान्यावर आयुक्तांनी ‌‘आरआरसी' अंतर्गत कारवाई केली आहे. कायद्यानुसार ऊस गाळप झाल्यानंतर 14 दिवसांत शेतकऱ्यांना एफआरपी मिळणे बंधनकारक आहे

गोकुळ शुगर्स लि. सोलापूर यांच्याकडे सर्वाधिक 130 कोटी रुपयांची थकबाकी आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील 34 गावांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल 130 कोटी रुपयांचे एफआरपी बिल थकवले आहे. साखर आयुक्त यांच्या परवान्याशिवाय विनापरवाना गाळप करणेसह अन्य बाबी आहेत. थकबाकीवर 15 टक्के दराने व्याज आकारण्याचेही साखर आयुक्तांच्या आदेशात नमूद आहे. 

गोकुळ साखर कारखान्याने चेन्नई येथील एका कंपनीला 15 कोटी रुपयांना फसवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता शिंदे हे चेअरमन असुन ते भाजप पक्षाशी संबंधित आहेत. शेतकऱ्यांनी जवळपास 20 दिवस आंदोलन केले होते. 29 जुन ते 3 जुलै या काळात 987 शेतकऱ्यांचे पैसे दिले जाणार असुन उर्वरीत बील सोमवार ते शुक्रवार या काळात वेळापत्रक जाहीर करून दिले जाईल अशी माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली.

भीमा सहकारी साखर कारखाना सोलापूर 30 कोटी 22 लाख, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर 22 कोटी 44 लाख, सचिन घायळ शुगर्स प्रा. लि. 19 कोटी 49 लाख, श्री संत कूर्मदास सहकारी साखर कारखाना 15 कोटी 97 लाख, भीमाशंकर शुगर मिल्स लि 12 कोटी 26 लाख थकबाकी आहे. कारखान्याची साखर, जमीन किंवा यंत्रसामग्री जप्त करून आणि तिचा लिलाव करून शेतकऱ्यांचे थकीत पैसे वसूल केले जातील.


 
Top