परंडा (प्रतिनिधी)- देशातील स्पर्धा परीक्षा म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा असतो.विद्यार्थी वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करतात, पालक आपल्या कष्टाच्या पैशातून मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात आणि त्यांच्या यशाची स्वप्ने पाहतात. परंतु प्रत्येक वेळी पेपरफुटी, गैरव्यवहार, परीक्षा रद्द होणे किंवा प्रशासकीय निष्काळजीपणा यामुळे ही स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त होतात.अलीकडे विविध स्पर्धा परीक्षांबाबत, तसेच टीईटीसारख्या परीक्षांबाबत पेपरफुटीच्या बातम्या समोर येत आहेत. अशा घटना केवळ परीक्षेची विश्वासार्हताच कमी करत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करतात.

एकीकडे काही मिनिटे उशीर झाला म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला जातो, तर दुसरीकडे पेपरफुटी करणारे रॅकेट अनेकदा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी मोकळेपणाने खेळताना दिसतात. नियमांचे पालन आवश्यक असले तरी नियमांमध्ये मानवी संवेदनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. एखादा विद्यार्थी वाहतूक कोंडी, नैसर्गिक अडचण किंवा अपरिहार्य कारणामुळे काही मिनिटे उशिरा पोहोचला. तर त्याच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय काही मिनिटांवर होणे ही चिंतेची बाब आहे. पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. अनेक जण नैराश्याला बळी पडतात, तर काहीजण टोकाची पावले उचलतात. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना समाजासाठी अत्यंत वेदनादायक आहेत. अशा प्रत्येक घटनेमागे केवळ एक विद्यार्थी नाही, तर एका कुटुंबाची स्वप्ने, आशा आणि आयुष्य उद्ध्वस्त झालेले असते.

या परिस्थितीस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर आणि जलद कारवाई झाली पाहिजे. पेपरफुटी करणारे, त्यांना मदत करणारे आणि निष्काळजीपणा करणारे अधिकारी यांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय अशा घटनांना आळा बसणार नाही. त्याचबरोबर परीक्षा प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक व्यवस्था, मजबूत सुरक्षा आणि वेळेत न्याय देणारी यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे.

विद्यार्थी हा देशाचा भविष्यकाळ आहे. त्याच्या कष्टाचा, प्रामाणिकपणाचा आणि स्वप्नांचा सन्मान करणे ही शासन, प्रशासन आणि संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची असावी, त्यांच्या संयमाची किंवा व्यवस्थेतील त्रुटींची नव्हे. आज गरज आहे ती केवळ निषेध करण्याची नाही, तर ठोस कृती करण्याची. अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे की जिथे प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षा देईल आणि त्याच्या यशाचा निर्णय फक्त त्याच्या गुणवत्तेवर होईल. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळ करणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीला कायद्याचा कठोर धाक बसला, तरच शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण होईल. कारण विद्यार्थ्यांची स्वप्ने वाचली तरच देशाचे भविष्य सुरक्षित राहील.

 
Top