तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील गावागावातील नागरिकांच्या मूलभूत समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी आणि त्यावर प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी 'राजकारण विरहित संवाद दौरा' हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यात ते तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन ग्रामस्थ, शेतकरी, महिला, युवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार असून, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना मधुकरराव चव्हाण म्हणाले की, तुळजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत अनेक प्रश्न गंभीर स्वरूपात समोर येत आहेत. एकीकडे पावसाने जवळपास महिनाभर दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत असून खरीप हंगाम धोक्यात आला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, वीजपुरवठ्यातील अडचणी, आरोग्य सुविधा, शिक्षण, सिंचन आणि इतर मूलभूत प्रश्नांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. “माझ्याकडे दररोज अनेक ग्रामस्थांचे फोन येतात. प्रत्येक समस्येवर फोनवर चर्चा करण्यापेक्षा संबंधित गावात जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे गावागावात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. हा दौरा कोणत्याही राजकीय हेतूने नसून केवळ जनतेच्या प्रश्नांसाठी आहे,“ असे त्यांनी स्पष्ट केले.
या संवाद दौऱ्यात प्रत्येक गावातील नागरिकांना आपले प्रश्न, अडचणी आणि विकास कामांबाबतच्या अपेक्षा थेट मांडण्याची संधी मिळणार आहे. ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित कामे, रस्ते, पाणी, वीज, शेतकऱ्यांच्या अडचणी, शासकीय योजनांची अंमलबजावणी, तसेच युवक आणि महिलांच्या विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात येणार आहे. मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले की, गावभेटीदरम्यान समोर आलेल्या प्रत्येक प्रश्नाची रीतसर नोंद घेतली जाईल. त्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी, प्रशासन तसेच तालुक्याचे आमदार, जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. जनतेच्या अडचणी केवळ ऐकून न घेता त्या सोडविण्यासाठी प्रभावी प्रयत्न करणे हेच या दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. तुळजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन केले.
गावपातळीवरील प्रश्न वेळेत सोडविल्यास विकासाला गती मिळेल आणि प्रशासन व नागरिकांमधील संवाद अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या 'राजकारण विरहित संवाद दौऱ्या'मुळे तालुक्यातील विविध गावांतील प्रलंबित प्रश्नांना वाचा फुटण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा हा प्रयत्न असेल.
“माझ्या राजकीय प्रवासात तुळजापूर तालुक्यासह ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. गावागावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी साठवण तलाव, पाझर तलाव आणि जलसंधारणाची विविध कामे केली. प्रत्येक गावात नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सभागृह उपलब्ध व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणात सभागृहांची उभारणी करण्यात आली. तसेच गावोगावी जोडणाऱ्या रस्त्यांचे विस्तृत जाळे निर्माण करून ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम केले.
शेतकऱ्यांच्या शेतीला अखंडित वीजपुरवठा मिळावा, सिंचन व्यवस्था सक्षम व्हावी आणि शेती उत्पादन वाढावे यासाठी वीज सुविधांचा विस्तार करून कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी पायाभूत सुविधांबरोबरच शिक्षण क्षेत्रालाही विशेष महत्त्व दिले. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागू नये म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालय, सैनिक शाळा तसेच बालाघाट शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली. अनेक गावांमध्ये शैक्षणिक संस्थांचा विस्तार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. आर्थिक अडचणी किंवा सुविधांच्या अभावामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
आजही त्या काळात उभारलेल्या विकासकामांची आणि शैक्षणिक सुविधांची व्यवस्था सुरळीत सुरू राहणे आवश्यक आहे. विकासकामे केवळ उभारणे पुरेसे नसते, तर ती टिकवणे आणि अधिक सक्षम करणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे नागरिकांच्या सहकार्याने आणि प्रशासनाशी समन्वय साधून या सर्व सुविधा अधिक प्रभावीपणे सुरू राहाव्यात, यासाठी माझे सातत्याने प्रयत्न राहतील,“ असे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले. यावेळी मुकुंद दादा डोंगरे,अमर भैया मगर, रसिक वाले, विलास सरडे, लालासाहेब मगर, तुळशीदास साखरे, रवी कापसे, तानाजी जाधव, दीपक जाधव, परमेश्वर कराळे, बाळासाहेब जाधव, प्रभाकर पाटील, बाबासाहेब जाधव यांच्यासह पत्रकार व कार्यकर्ते उपस्थित होते.
