खव्यात भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये एफडीए मुळे दहशत.

 संवाददाता भुम प्रतिनिधी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) धडक कारवाईमुळे भूम तालुक्यात दूध व खव्यात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असल्याने अनेकांनी भेसळीचे प्रकार थांबविल्याची चर्चा दूध उत्पादक व नागरिकांमध्ये सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत राज्यातील विविध भागांत एफडीएने भेसळयुक्त दूध, खवा व दुग्धजन्य पदार्थांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्याचे पडसाद आता भूम तालुक्यातही उमटू लागले आहेत.
भूम तालुका हा दुग्ध उत्पादनासाठी ओळखला जातो. तालुक्यात दररोज अंदाजे दीड ते दोन लाख लिटर दूध संकलित केले जाते. तसेच मोठ्या प्रमाणावर खव्याचे उत्पादनही येथे केले जाते. तालुक्यातील दूध व खवा राज्यातील तसेच इतर राज्यांतील बाजारपेठांमध्ये पाठविला जातो. काही ठिकाणी खव्यापासून पेढे व अन्य मिठाई तयार करून विक्री केली जाते. त्यामुळे या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते.
मात्र वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी दुधामध्ये पाणी, रासायनिक पदार्थ तसेच इतर घटक मिसळून भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर आल्या होत्या. खव्यामध्येही निकृष्ट दर्जाचे पदार्थ मिसळून उत्पादन केल्याची प्रकरणे यापूर्वी उघडकीस आली होती. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
दरम्यान, एफडीएकडून राज्यभर सुरू असलेल्या कारवायांमुळे भूम तालुक्यातील दूध व खवा व्यावसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक तपासणी, नमुने संकलन आणि प्रयोगशाळा चाचण्यांमुळे भेसळ करणाऱ्यांवर दबाव वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी भेसळीचे प्रकार कमी झाल्याचे दूध उत्पादक व ग्राहकांचे म्हणणे आहे.
नागरिकांच्या मते, भूम तालुक्यातही नियमितपणे दूध संकलन केंद्रे, खवा उत्पादन युनिट्स व मिठाई उत्पादकांची तपासणी होणे आवश्यक आहे. भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाल्यास ग्राहकांना शुद्ध व सुरक्षित अन्नपदार्थ मिळतील, तसेच प्रामाणिक दूध उत्पादकांचेही हित जपले जाईल.
"शुद्ध अन्न हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करावी," अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भूम तालुक्यातील दुग्ध व्यवसायाची चांगली प्रतिमा कायम राखण्यासाठी प्रशासनाने नियमित तपासणी मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
 
Top