धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज संपूर्ण धाराशीव जिल्ह्यातील सर्व 19 मंडलांमध्ये विविध ठिकाणी भव्य योगशिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यक्रम धाराशीव येथील भाजपा जिल्हा कार्यालय, 'प्रतिष्ठान भवन' येथे सकाळी ठीक 6:00 वाजता पार पडला. या उपक्रमात जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी अत्यंत उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
धाराशीव येथील मुख्य योगसाधना कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, मराठवाडा संयोजक नितीन काळे, ॲड. नितीन भोसले, ॲड. अनिल काळे, जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर, संयोजक डॉ. गोविंद कोकाटे, सह संयोजक डॉ. मनोज घोगरे, सौ. प्रिती कदम, शहर संयोजक प्रमोद बचाटे, आणि शहर सरचिटणीस रोहित देशमुख यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष योग सत्राचे मार्गदर्शन 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे योग शिक्षक लक्ष्मण काकडे व सचिन मोकाशे यांनी केले. त्यांनी उपस्थित साधकांकडून प्राणायाम, सूर्यनमस्कार, विविध आसने आणि ध्यानधारणा (मेडिटेशन) यांचे शास्त्रोक्त पद्धतीनुसार प्रात्यक्षिक करून घेतले. “योग केवळ शारीरिक तंदुरुस्ती देणारे माध्यम नसून, ते मानसिक स्थैर्य आणि जीवनात सकारात्मकता आणणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे,“ असे प्रतिपादन मार्गदर्शन करताना लक्ष्मण काकडे व सचिन मोकाशे यांनी केले.
या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात निरोगी शरीर आणि शांत मनासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने आज संपूर्ण जिल्ह्यात सर्व 19 मंडलांमध्ये हा योग साधनेचा उपक्रम यशस्वीपणे राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
