धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरातील समता नगर परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 9 च्या नगरसेविका रुपालीताई सुनील आंबेकर यांच्या पुढाकारातून नगर परिषद शाळा क्रमांक 11 येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श संदेश देण्यात आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेविका रुपालीताई आंबेकर यांनी बोलताना सांगितले की, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. डॉ. प्रतापसिंह भैय्या पाटील यांच्या सामाजिक व लोकाभिमुख कार्यातून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. प्रतापसिंह पाटील हे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शांत संयमी व सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध भागांत सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रक्तदान, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप तसेच जनहिताच्या विविध कार्यक्रमांद्वारे वाढदिवस साजरा केला. सामाजिक जाणिवेतून आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमास बालाजी मगर, पंकज भोसले, रोहित बागल, ॲड. योगेश सोने पाटील, रणवीर इंगळे, बाळासाहेब शहापुरे, प्रवीण लुंगसे, मंगेश काटे, सुशांत बनसोडे, अजिंक्य हिबारे, आवेज मोमीन, अमित महांकाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top