तुळजापूर- मराठवाड्यातील व विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ, स्थलांतर, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, सामाजिक विषमता आणि विकासातील असमतोल यांसारख्या गंभीर प्रश्नांनी ग्रासलेल्या भागात विकासाची नवी दृष्टी, लोकसहभागाची नवी संस्कृती आणि संशोधनाधारित कृतीची नवी दिशा देण्याचे ऐतिहासिक कार्य टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर यांनी गेल्या चार दशकांपासून सातत्याने केले आहे.
सन 1986 च्या दशकात या भागात स्वयंसेवी संस्था, समुदाय सहभाग, कृती संशोधन, लोकसहभागी विकास, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी, समुदायाधारित संस्था आणि लोकसहभागातून विकास या संकल्पना तळागाळापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. विकास म्हणजे केवळ शासनाची जबाबदारी अशीच सर्वसामान्यांची धारणा होती. अशा परिस्थितीत लोकांच्या समस्या समजून घेणे, त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करणे, स्थानिक संसाधनांवर आधारित उपाययोजना विकसित करणे आणि शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्थाही विकास प्रक्रियेत प्रभावी भूमिका बजावू शकतात, याची जाणीव सर्वप्रथम तुळजापूरने करून दिली.
सुरुवातीला ग्रामीण विकास अध्ययन शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेने ग्रामीण भारतातील समस्यांचा केवळ अभ्यासच केला नाही, तर त्या समस्यांवर तळागाळात जाऊन लोकांसमवेत काम करून शाश्वत उपाययोजनांची यशस्वी प्रारूपे उभी केली. सन 1989 पासून आजपर्यंत तुळजापूरने 80 हून अधिक क्षेत्रीय कृती, संशोधन, मूल्यांकन, क्षमतावर्धन आणि समुदाय विकास प्रकल्प यशस्वीरित्या राबविले आहेत. हे प्रकल्प केवळ अहवाल किंवा संशोधनापुरते मर्यादित नसून त्यांनी लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.
तुळजापूरचे प्रमुख स्तंभ : विकासाभिमुख शिक्षणाची भक्कम पायाभरणी
टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) तुळजापूर कॅम्पसने स्थापनेपासूनच ग्रामीण आणि वंचित समाजघटकांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून कार्य केले आहे. या कार्याचा पाया पाच महत्त्वपूर्ण स्तंभांवर उभा आहे.
1. शिक्षण : ज्ञान, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीची जडणघडण
तुळजापूरमधील शिक्षण हे केवळ पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यापुरते मर्यादित नाही. येथे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक वास्तवाचे आकलन, चिकित्सक विचारसरणी, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि विकास प्रक्रियेतील जबाबदारीची जाणीव निर्माण केली जाते.
ग्रामीण विकास, सामाजिक कार्य, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, उपजीविका, स्थानिक स्वराज्य संस्था, लिंग समानता, सामाजिक न्याय आणि शाश्वत विकास यांसारख्या विषयांचे शिक्षण प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभवाशी जोडले जाते. त्यामुळे विद्यार्थी केवळ ज्ञानसंपन्न होत नाहीत, तर समाजातील प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणारे संवेदनशील व्यावसायिक म्हणून घडतात.
2. संशोधन : समाजपरिवर्तनासाठी ज्ञाननिर्मिती
संशोधन हा TISS तुळजापूरचा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. समाजातील वास्तव समस्यांचे वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करून त्यामागील कारणे, परिणाम आणि संभाव्य उपाय शोधण्याचे कार्य संशोधनाद्वारे केले जाते.
दुष्काळ, जलव्यवस्थापन, ग्रामीण गरिबी, शेती, महिला सक्षमीकरण, स्थलांतर, रोजगार, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि स्थानिक प्रशासन अशा विविध विषयांवर संस्थेने महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. या संशोधनातून निर्माण झालेले ज्ञान केवळ शैक्षणिक चर्चेपुरते मर्यादित राहत नाही, तर धोरण निर्मिती, विकास कार्यक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी यासाठीही मार्गदर्शक ठरते.
3. क्षेत्रीय कृती प्रकल्प : प्रयोगातून परिवर्तनाची वाटचाल
क्षेत्रीय कृती प्रकल्प हे TISS तुळजापूरचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी योगदान मानले जाते. समाजातील समस्यांवर केवळ अभ्यास करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करून त्यावर उपाय शोधण्याची परंपरा या प्रकल्पांनी निर्माण केली.
गावपातळीवरील जलसंधारण, पाणलोट विकास, शाश्वत शेती, महिला बचत गट, युवक सक्षमीकरण, उपजीविका विकास, ग्रामसंस्था बळकटीकरण, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग आधारित विकास अशा विविध क्षेत्रांत अभिनव प्रयोग राबविण्यात आले.
4. विस्तार व क्षमतावर्धन : लोकशक्तीला विकासाची दिशा
कोणत्याही विकास प्रक्रियेचे यश लोकांच्या सहभागावर आणि क्षमतेवर अवलंबून असते. ही बाब लक्षात घेऊन TISS तुळजापूरने विस्तार व प्रशिक्षण कार्यक्रमांना विशेष महत्त्व दिले आहे. शेतकरी, महिला, युवक, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संस्था, शासकीय कर्मचारी, समुदाय नेते आणि विविध हितधारकांसाठी सातत्याने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. सहभागी ग्रामीण मूल्यांकन , जलव्यवस्थापन, शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण, ग्रामीण उपजीविका, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक न्याय आणि समुदाय संघटन यांसारख्या विषयांवरील प्रशिक्षणांमुळे हजारो व्यक्ती आणि संस्था सक्षम झाल्या आहेत.
5. दस्तऐवजीकरण : अनुभवांचे ज्ञानात रूपांतर
दस्तऐवजीकरण हा TISS तुळजापूरच्या कार्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम घडविणारा स्तंभ आहे. विकास प्रक्रियेतून मिळालेले अनुभव, शिकवण, यशोगाथा, संशोधन निष्कर्ष, नवोपक्रम आणि सामाजिक परिवर्तनाच्या कथा यांचे शास्त्रशुद्ध संकलन व नोंदणी करण्याचे कार्य दस्तऐवजीकरणाद्वारे केले जाते. TISS तुळजापूरने विविध संशोधन अहवाल, प्रकरण अभ्यास, यशोगाथा, प्रशिक्षण पुस्तिका, शैक्षणिक प्रकाशने आणि विकास अनुभवांचे दस्तऐवजीकरण करून सामाजिक क्षेत्रासाठी समृद्ध ज्ञानसंपदा निर्माण केली आहे.
ग्रामीण विकासाच्या विविध क्षेत्रांतील व्यापक योगदान
तुळजापूरने ग्रामीण विकासाच्या जवळपास सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सहभागी ग्रामीण मूल्यांकन व सूक्ष्मस्तरीय नियोजन (1989), पाणलोट क्षेत्र विकास, महिला आरोग्य, पंचायती राज, ग्रामीण उपजीविका, शाश्वत शेती, ग्रामीण पिण्याचे पाणी, दलित नेतृत्व, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, शेतकरी आत्महत्या अभ्यास, दुष्काळ निवारण, युवा सहभाग, हवामान अनुकूल शेती, जलशक्ती अभियान, उन्नत भारत अभियान, आपत्ती व्यवस्थापन, कोविड समुपदेशन, विमुक्त-भटक्या जमातींचा विकास, पाणी-स्वच्छता-आरोग्य आणि समुदाय आधारित शाश्वत विकास यांसारख्या विविध विषयांवर संस्थेने अभ्यास, संशोधन आणि प्रत्यक्ष कृती उपक्रम राबविले आहेत. विशेषतः दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, जलसंधारण, ग्रामीण उपजीविका, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि समुदाय नेतृत्व विकास या क्षेत्रांतील TISS चे कार्य राज्य व राष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शक ठरले आहे.
समाज परिवर्तनाची प्रयोगशाळा म्हणून TISS तुळजापूर
TISS तुळजापूरची खरी ओळख ही केवळ शैक्षणिक संस्था म्हणून नसून “समाज परिवर्तनाची प्रयोगशाळा” म्हणून आहे. येथे राबविले जाणारे क्षेत्रीय कृती प्रकल्प हे वर्गातील ज्ञान आणि समाजातील वास्तव यांना जोडणारा प्रभावी सेतू आहेत.
शेतकरी आत्महत्या अभ्यास, दुष्काळ निवारण प्रकल्प, महिला आरोग्य अभ्यास, ग्रामीण उपजीविका विकास, जलसंधारण, पंचायत राज संस्था, विमुक्त-भटक्या जमातींचा विकास, युवा सहभाग, जलशक्ती अभियान, उन्नत भारत अभियान, कोविड समुपदेशन हेल्पलाईन, आपत्ती व पुनर्बांधणी क्षेत्रीय कृती प्रकल्प आणि समुदाय आधारित शाश्वत विकास प्रकल्प यांसारख्या अनेक उपक्रमांनी समाज परिवर्तनाची दिशा निश्चित केली आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी क्षेत्रीय कृती व संशोधन प्रकल्पांचे महत्त्व
विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान प्राप्त होत नाही, तर सामाजिक वास्तव समजून घेण्याची आणि विकास प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी मिळते.
क्षेत्रीय कार्य, प्रशिक्षणार्थी कार्य (इंटर्नशिप), संशोधन प्रबंध, ग्रामीण प्रायोगिक अध्ययन, क्षेत्रीय नियुक्ती, समुदाय सहभाग, सहभागी संशोधन आणि कृती संशोधन या सर्व शैक्षणिक प्रक्रियांना क्षेत्रीय कृती प्रकल्प भक्कम आधार देतात.
या प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये :
सामाजिक वास्तवाची सखोल समज विकसित होते. समस्या विश्लेषण आणि उपाययोजना कौशल्य विकसित होते. समुदायाशी संवाद साधण्याची क्षमता वाढते. नेतृत्व आणि संघटन कौशल्य विकसित होते. संशोधन कौशल्य व धोरणात्मक विचार विकसित होतो. प्रकल्प व्यवस्थापनाची व्यावहारिक समज निर्माण होते. विकास क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव प्राप्त होतो. सामाजिक संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दृढ होते. लोकसहभागावर आधारित विकास प्रक्रियेची सखोल जाण निर्माण होते.
समुदाय सहभाग, “शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे” आणि भविष्यकालीन दिशा
TISS चे “शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे” आणि “भविष्याची पुनर्कल्पना” हे ध्येय प्रत्यक्षात साकार करण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे क्षेत्रीय कृती व संशोधन प्रकल्प होय. आज कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी, शासकीय समन्वय, आंतरराष्ट्रीय सहकार्य, संशोधन अनुदान, विकास भागीदारी, परिणामाधारित संशोधन आणि सामाजिक नवोपक्रम यांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. अशा वेळी तळागाळातील समुदायांशी असलेले दीर्घकालीन संबंध, चार दशकांचा क्षेत्रीय अनुभव, संशोधनाधारित विकास प्रारूपे आणि समाजामध्ये निर्माण झालेली विश्वासार्हता यामुळे तुळजापूरकडे या क्षेत्रात नेतृत्व करण्याची अद्वितीय क्षमता आहे.
गेल्या चार दशकांहून अधिक काळात TISS तुळजापूरने केवळ विद्यार्थी घडविले नाहीत, तर समाज परिवर्तनाची व्यापक प्रक्रिया उभी केली आहे. हजारो विद्यार्थी, शेकडो समुदाय नेते, असंख्य महिला बचत गट, शेतकरी, युवक आणि ग्रामीण नागरिकांना विकास प्रक्रियेशी जोडत संस्थेने ज्ञाननिर्मिती, लोकसक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. “ TISS तुळजापूरची खरी ताकद वर्गखोल्यांबरोबरच गावागावांत, शेतकऱ्यांच्या बांधावर, महिलांच्या बचत गटांमध्ये, युवकांच्या नेतृत्वामध्ये आणि समाज परिवर्तन घडवून आणणाऱ्या क्षेत्रीय कृती व संशोधन प्रकल्पांमध्ये आहे.”
श्री गणेश चादरे
सामाजिक कार्यकर्ता
टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), तुळजापूर.
,%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80%202.jpeg)
,%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80%20%201.jpeg)