तुळजापूर (प्रतिनिधी)- तांत्रिक तपास, टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तुळजापूर व सोलापूर येथून चोरीस गेलेल्या दोन स्विफ्ट डिझायर कारांचा छडा लावत पोलिसांनी एका सराईत कारचोराला अटक केली आहे. तेलंगणातील निजामाबाद येथून दोन्ही कार जप्त करण्यात आल्या असून आरोपीला तुळजापूर पोलिसांनी अटक करून पुढील चौकशी चालू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथील जितेंद्र मधुसूदन भूमकर यांच्या नातेवाईकांची अंदाजे 7 लाख रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर (एमएच-12 आरके-6311) ही कार दि. 14 मे 2026 रोजी नळदुर्ग रोडवरील विठ्ठल पतसंस्थेसमोर उभी असताना चोरीस गेली होती. त्याचप्रमाणे दि. 19 मे 2026 रोजी सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी एक स्विफ्ट डिझायर कार चोरीस गेली होती. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना तुळजापूर व फौजदार चावडी पोलिसांनी संयुक्तपणे तांत्रिक विश्लेषण केले. टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज, फास्टॅग व्यवहारांची माहिती तसेच मोबाईल तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान समद मेहमुद शेख (रा. निजामाबाद, तेलंगणा) याचे नाव समोर आले.
पोलिसांनी दि. 6 जून 2026 रोजी निजामाबाद येथे कारवाई करून दोन्ही स्विफ्ट डिझायर कार जप्त केल्या आणि आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने गाडीची काच फोडून साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील दुसरा साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपीला तुळजापूर पोलीस ठाण्यात आणून चार दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या आदेशाने पोलीस हवालदार संतोष कारवार तसेच फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार साथीदाराला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
