धाराशिव (प्रतिनिधी)- जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच आज झाली जिजामाता कृषी भूषणाची मानकरी!“ या उक्तीचा प्रत्यय देणारी अभिमानास्पद बाब म्हणजे सौ. प्रतिभा रामराव काळे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा 'जिजामाता कृषी भूषण पुरस्कार 2023' (लातूर विभाग) जाहीर झाला आहे.
प्रतिभा रामराव काळे आणि त्यांचे पती रामराव काळे यांनी गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे, जिद्दीने आणि अथक परिश्रमाने शेतीची जोपासना केली आहे. आंबा बाग तसेच विविध फळबागांचे त्यांनी सेंद्रिय पद्धतीने संवर्धन करत शेतीला एक वेगळी दिशा दिली आहे. आपल्या बागेतील रसाळ आणि दर्जेदार फळे नातवंडांना तसेच घरी येणाऱ्या पाहुण्यांना प्रेमाने खाऊ घालणे हा त्यांचा आवडता छंद असून, शेतीविषयीचे त्यांचे प्रेम आणि निसर्गाशी असलेली नाळ आजही तितकीच दृढ आहे.
त्यांच्या या अविरत परिश्रमांची, निष्ठेची आणि सेंद्रिय शेतीतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना 'जिजामाता कृषी भूषण पुरस्कार 2023' जाहीर करून गौरविले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याने काळे कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण असून, शेतकरी वर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे.त्या भाजपा नेते तथा मराठवाडा संयोजक नितीन काळे यांच्या मातोश्री आहेत.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपा नेते नितीन काळे यांनी सांगितले की, “आई-वडिलांनी आयुष्यभर कष्ट, प्रामाणिकपणा आणि शेतीप्रती असलेली निष्ठा जपली. त्यांच्या कार्याचा सन्मान महाराष्ट्र शासनाने केल्याने आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. त्यांची कृषी क्षेत्रातील सेवा आणि जीवनमूल्ये आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.“ प्रतिभा रामराव काळे यांना जाहीर झालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
