धाराशिव (प्रतिनिधी)- ढोकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कसबे तडवळे येथे शेतरस्ता मोजणीसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर स्थानिक कुटुंबीयांनी हिंसक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मोजणीला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपर तहसीलदार, धाराशिव यांच्या आदेशानुसार, 25 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता नायब तहसीलदार एम.जी. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथक, ज्यामध्ये मंडळ अधिकारी संभाजी जयराम तोगरे, ग्राम महसूल अधिकारी एच.आर. जाधव, आणि महसूल सेवक अमर मुजावर यांचा समावेश होता, कसबे तडवळे येथील गट नंबर 76 व 77 च्या उत्तर बाजूच्या बांधावर शेतरस्ता मोजणीसाठी पोहोचले होते.

मोजणी सुरू असताना विलास दत्तात्रय पवार, विमल विलास पवार आणि श्रीधर विलास पवार यांनी तीव्र विरोध दर्शवला. शासकीय कर्मचाऱ्यांना “रस्ता करू नका, अन्यथा आम्ही पेट्रोल टाकून जिवंत जाळून घेऊ,“ अशी धमकी देत त्यांनी मोजणीचे टेप लाथ मारून तोडले आणि कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

दुपारी सव्वा एकच्या सुमारास काही अंतरावरून आरडाओरडा ऐकू आला. कर्मचारी आणि पोलिसांनी तेथे धाव घेतली असता, विलास दत्तात्रय पवार यांच्या पँटला आग लागलेली दिसली, ज्यात त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. या गोंधळादरम्यान, विमल विलास पवार यांनी नायब तहसीलदार शिंदे यांच्या श्रीमुखात भडकावली. विलास पवार यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करत “तुझ्या घरासमोर येऊन आत्महत्या करेन,“ अशी धमकीही दिली. जखमी विलास पवार यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

मंडळ अधिकारी संभाजी जयराम तोगरे यांच्या फिर्यादीवरून, ढोकी पोलिसांनी विलास दत्तात्रय पवार, विमल विलास पवार आणि श्रीधर विलास पवार यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 132, 226, 221, 352, 351(2), 351(3) आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास असिस्टंट सब-इन्स्पेक्टर बापुजी गोपाळराव पुरके करत आहेत.

शासकीय कामात अडथळा आणणे, लोकसेवकांवर हल्ला करणे आणि आत्महत्येचे नाट्य घडवणे यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये प्रशासकीय स्तरावर गांभीर्याने दखल घेतली जाण्याची गरज व्यक्त होत आहे. अशा संवेदनशील प्रकरणांची हाताळणी वरिष्ठ स्तरावरूनच व्हावी, जेणेकरून जबाबदारी निश्चित होईल आणि कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य टिकून राहील, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

 
Top