धाराशिव  (प्रतिनिधी)- नीट नंतर टीइटीच्या पेपर फुटीमुळे राज्यातील लाखो प्रमाणिक शिक्षक, विद्यार्थी व तरुणांच्या भवितव्याचा भाजप शिवसेना सरकारच्या  निष्क्रियतेमुळे खेळखंडोबा झाला  असल्याची टीका समाजवादी नेते ॲड रेवण भोसले यांनी  केली आहे. नीट परीक्षा घोटाळा किंवा पेपरफुटी बाबत देशभरात विद्यार्थी संघटना व तरुणांनी केलेल्या आंदोलनकर्त्यांना केंद्रीय शिक्षण  मंत्र्याने  दहशतवादी म्हणून संबोधले तर आता महाराष्ट्रात झालेल्या  पेपर फुटी व गैरप्रकार करणाऱ्या सरकार विरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना फडणवीस -शिंदे ठोक भावात खरेदी करून फोडण्याचा प्रयत्न करतील काय? असा सवाल  भोसले यांनी केला आहे .पेपर फुटीच्या प्रत्येक प्रकरणानंतर केवळ चौकशी, अटक व कारवाईची घोषणा केली जाते परंतु सरकार अशा गैरकर्त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. सततची पेपर फुटी व परीक्षा रद्द होण्यामुळे तरुणांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. गेल्या दशकभरात महाराष्ट्रात अशा पेपर फुटीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र बदनाम होत आहे. राष्ट्रीय पातळीवरील नीट गैरप्रकारानंतर आता थेट महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला पेपर फुटीच्या प्रकरणामुळे मोठा डाग लागला आहे. दि.28 जून 2026 रोजी होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी मुळे रद्द करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल चार लाख 28 हजार ते सहा लाख भावी शिक्षकांचे भवितव्य  टांगणीला लागण्यास केवळ भाजप शिवसेना सरकारचा ढिसाळ कारभारच जबाबदार  असल्याचा आरोपही ॲड. भोसले यांनी केला आहे.

 
Top