येडशी, (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत येडशी टोलनाका येथे राबवण्यात आलेल्या 'ट्रांझिट बूथ' उपक्रमाला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी, चांदन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, धाराशिव व टोलनाका पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांतील 0 ते 5 वर्षे वयोगटातील 127 बालकांना जागीच पोलिओ डोस पाजण्यात आला.  


महामार्गावरच मिळाले सुरक्षा कवच  

प्रवासात असलेल्या एकाही बालकाचा डोस चुकू नये, यासाठी टोलनाक्यावर विशेष नियोजन करण्यात आले होते. कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रवासी वाहने, एसटी बस व खाजगी गाड्या थांबवून आरोग्य पथकाला सहकार्य केले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी तत्परतेने गाडीतील बालकांना पोलिओ लस पाजली. “लांबच्या प्रवासात मुलाला लस कुठे मिळणार याची काळजी होती, पण टोलनाक्यावरच लस मिळाल्याने मोठी सोय झाली,“ अशी प्रतिक्रिया सोलापूरच्या प्रवासी सौ. कविता पाटील यांनी दिली.  


आरोग्य दूतांची तत्परता, पोलिसांची सतर्कता  

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी टोलनाका बूथ  प्रमुख डॉ. विलास तोडकर, युवराज चौगुले, रवींद्र मैदाड, आरोग्य सहायक  सुनील कदम व  लक्ष्मण तिंडे यांनी सकाळी 8 ते सायं. 6 वाजेपर्यंत अविरत परिश्रम घेतले. पोलीस हवालदार समाधान शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहने थांबवून पालकांना लस देण्याचे आवाहन केल्याने मोहिमेला गती मिळाली.  


चांदन संस्थेचे मोलाचे योगदान  

चांदन बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत विठ्ठल गंगावणे व त्यांच्या स्वयंसेवकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाका व येडशी आळणी परिसरात फिरून बालकांना शोधून लस मिळवून दिली. तसेच पालकांचे समुपदेशन करून लसीचे महत्व पटवून दिले.  


तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून अभिनंदन  

आरोग्य विभागाचे चोख नियोजन, पोलिसांची तत्परता आणि चांदन संस्थेची सेवाभावी वृत्ती यांच्या त्रिवेणी संगमामुळे येडशी परिसरातील पल्स पोलिओ मोहीम 100% यशस्वी ठरली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद गिरी यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 
Top