धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद,जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय,धाराशिव तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने 15 जून रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आणि सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभिश्री देव यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक व माजी शिक्षक राजेंद्र गोपाळराव अत्रे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, अधिकार तसेच त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सुविधांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. खंडेराव चौरे उपस्थित होते. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहाण यांनी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सोयी -सुविधांची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच डॉ.धनंजय चाकुरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल,असे सांगत विविध विशेष योजनांची माहिती दिली.
अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे पोलीस प्रशासनामार्फत तातडीने निवारण करण्यात येईल, अशी ग्वाही उपस्थितांना दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या विविध योजनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात पाटील यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. भविष्यातही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत अशा प्रकारचे कायदेविषयक जनजागृतीपर उपक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येतील,असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या डिजिटल युगात ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी कार्यक्रमात विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.सायबर गुन्हे आणि आर्थिक सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोठ्या पडद्यावर माहितीपट दाखविण्यात आले. सायबर पोलीस स्टेशन,धाराशिवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कासुळे यांनी सायबर फसवणुकीपासून बचाव करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबिरात अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींची तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धाराशिव ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सचिव अनिल पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन ॲड.गौरी ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमास शहरातील माजी सैनिक,मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. तसेच आरोग्य विभाग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.