धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेमध्ये ग्रामसेवकांच्या बनावट सह्या, बनावट शिक्के, खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात बोगस नोंदण्या करून शासन निधीचा अपहार झाल्याचा गंभीर संशय व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी राज्य शासनाकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, कामगार विभाग तसेच जिल्हा प्रशासनाला सविस्तर स्मरणपत्र देण्यात आले आहे. यापूर्वी दि. 06 एप्रिल 2026 रोजीही निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही कोणतीही ठोस चौकशी अथवा कारवाई न झाल्याने संबंधित अधिकारी, कर्मचारी, दलाल, एजंट, गुत्तेदार व कंत्राटदार यांच्या संगनमतातून शासनाची फसवणूक झाल्याचा संशय अधिक बळावला असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

 
Top