धाराशिव (प्रतिनिधी)-  भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली असून, त्यानुसार उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी गुरुवार,दि.18 जून 2026 रोजी मतदान होणार आहे.या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेची गोपनीयता, पारदर्शकता आणि शिस्त अबाधित राखण्यासाठी मतदान केंद्रांच्या परिसरात मोबाईल वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्तपुस्तिकेतील भाग 13 मधील परिच्छेद 13.26 नुसार मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध घातला आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील एकूण 29 मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी घालणारा आदेश जारी केला आहे.

तथापि,निवडणूक प्रक्रियेशी संबंधित काही अधिकाऱ्यांना मोबाईल वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामध्ये पुढील अधिकाऱ्यांचा समावेश आहे: निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,क्षेत्रीय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक,मतदान केंद्राध्यक्ष प्रशासनाने या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून,आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम,1951 मधील तरतुदीनुसार आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा आदेश दि.15 जून 2026 रोजी जारी करण्यात आला असून, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात येणाऱ्या मतदारांनी तसेच संबंधितांनी या नियमांचे पालन करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top