धाराशिव (प्रतिनिधी)- 'नीट' आणि 'टीईटी' पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोणतीही चिंता नसून त्यांना केवळ फोडाफोडीचे व सत्तेचे राजकारण करण्यातच रस आहे. अशी घणाघाती टीका काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी केली.
धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजेनिंबाळकर म्हणाले की, 'नीट' आणि 'टीईटी' पेपरफुटी ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी झालेली गंभीर फसवणूक असून या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.
सरकारच्या शिक्षणविरोधी धोरणांविरोधात काँग्रेस पक्ष आता संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात तीव्र आंदोलने, मोर्चे आणि निषेध कार्यक्रम राबविणार असल्याची घोषणा राजेनिंबाळकर यांनी केली. या आंदोलनाची सांगता 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी नवी दिल्ली येथे काँग्रेसचे नेते तथा देशाचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, राजेंद्र शेरखाने, गणेश पवार, धनंजय राऊत, विनोद वीर, ॲड.सिराज मोगल, आप्पासाहेब शेळके, अझर पठाण, विजय मुद्दे, खलील सय्यद, अग्निवेश शिंदे, महेबुब पटेल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात मशाल पेटवून सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
