धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे हिंदी विभागांतर्गत निर्गुण ईश्वर उपासक संत कबीरदास यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए.के मंजुळकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी वरील प्रतिपादन केले.
ते पुढे म्हणाले की,संत कबीरांनी धर्मा धर्मात सांगड घातली, समाजाला एकत्रीत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. इश्वराची खरी व्याख्या त्यांनी आपल्या काव्यातून मांडली. पण तो काळ सोपा नव्हता. धर्मांध लोकांना हे सत्य पचणारे नव्हते कारण त्यांच्या साठी धर्म हा व्यवहार होता. समाजात अंधश्रद्धा पसरवणे आणि समाजाला आपल्या अधिपत्याखाली ठेवणे हा उद्योग त्यांचा होता. याच अंधश्रद्धेवर कबीरांनी प्रहार केला. त्यांनी सांगितले की, माणसाची सत्ता कायम स्वरुपी नाही याचे भान ठेवावे,पाण्यावर येणाऱ्या फुग्याचे आयुष्य लगेच संपत असते. या विश्वात आपण पाहुणे आहोत, पैसा, सत्ता राजकाज हे कायमस्वरूपी टिकणार नाही. टिकणार ते फक्त कर्म त्यामुळे चांगले कर्म करत रहा आणि समाजास उत्तम दिशा दाखवत जीवनाचा प्रवास करत रहा असे अनमोल विचार त्यांनी यावेळी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ केशव क्षीरसागर यांनी केले. सदर प्रसंगी मराठी विभागाचे सुप्रसिद्ध कवी डॉ अरविंद हंगरगेकर, प्रा माधव उगिले, डॉ दत्तात्रय साखरे, व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ विनोदकुमार वायचळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मंजुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
