साबळेनंतर हिंदवीची सुवर्णझेप; धाराशिवची कन्या ठरली विश्वविजेती
जागतिक योगासन स्पर्धेत फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात सुवर्णपदक; जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

धाराशिव : अहमदाबाद येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिवच्या हिंदवी चौरे हिने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावत विश्वविजेतेपदावर नाव कोरले. यापूर्वी जिल्ह्यातील योगपटू साबळे यांच्या जागतिक यशानंतर आता हिंदवीच्या सुवर्ण कामगिरीमुळे धाराशिवचा गौरव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर उंचावला आहे.

योगासन भारतच्या अधिपत्याखाली, गुजरात राज्य योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने तसेच केंद्र शासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत जगभरातील अव्वल योगपटूंनी सहभाग नोंदविला आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धाराशिवच्या खेळाडूंनी या स्पर्धेत उल्लेखनीय ठसा उमटविला.

‘धाराशिवची सुवर्णकन्या’ म्हणून ओळख असलेल्या हिंदवी चौरे हिने सब-ज्युनिअर वयोगटातील फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत सुवर्णपदकाची कमाई केली. तिच्या या यशामुळे भारताच्या पदकतालिकेत मोलाची भर पडली असून ती जागतिक योगासन स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी जिल्ह्यातील दुसरी योगपटू ठरली आहे.

हिंदवीच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर जिल्हाभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल अजमेरा, सचिव स्वाती गडदे, उपाध्यक्ष गौरव बागल, डॉ. स्वाती लाकाळ, सहसचिव राजेश बिलकुले, योगेश थोरबोले, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, स्पर्धा विभाग प्रमुख रामकृष्ण खडके, संचालक प्रणाली जगदाळे, सीमा चौरे, अश्विनी जाधव, इंदुमती जाधव, रामेश्वर सावंत, वंदना इंगळे यांच्यासह जिल्ह्यातील योगप्रेमींनी हिंदवीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.
 
Top