रोटरी आणि ग्लोबल विकास ट्रस्टच्या प्रशिक्षणातून कदेर गावातील शेतकऱ्यांना नवी दिशा

(मुरुम प्रतिनिधी)

खेड्यां कडे चला या महात्मा गांधी यांच्या विचारांचा मंत्र मयांक गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ग्लोबल विकास ट्रस्ट च्या शिरसाळा येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्रास रोटरी क्लब उमरगा यांच्या सौजन्याने कदेर गावातील 50 शेतकर्‍यांनी भेट देऊन शेती प्रशिक्षण पूर्ण केले.
प्रशिक्षण केंद्रात आगमन होताच शेतकऱ्यांचे अत्यंत आत्मीयतेने आणि सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागातील अन्नदात्या शेतकऱ्यांप्रती असलेला हा आदर आणि सन्मान उपस्थित शेतकर्‍यांना त्यांच्या मनाला भावला. 
प्रशिक्षणाची सुरुवातच सकारात्मक वातावरणात झाल्याने सहभागी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
प्रारंभी या प्रशिक्षण प्रकल्पाचे प्रमुख प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी शेतकरी भेटीचे आणि प्रशिक्षणाचा हेतू आपल्या प्रास्ताविकपर मार्गदर्शनात स्पष्ट केला.
या प्रशिक्षणामध्ये "शेतीचा विकास म्हणजे कुटुंबाचा विकास आणि कुटुंबाचा विकास म्हणजे गावाचा विकास" हा मूलमंत्र केंद्रस्थानी ठेवण्यात आला. शेतीतील प्रत्येक टप्प्याचे महत्त्व अधोरेखित करत तज्ज्ञांनी शेतजमिनीचे व्यवस्थापन, मातीचे आरोग्य, मशागत, पेरणी, दर्जेदार बियाण्यांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, आधुनिक कृषी यंत्रे व साधनांचा वापर, सेंद्रिय शेती तसेच माती परीक्षण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर , डॉ प्रविण मांजरे, माधुकर उंडाळकर, राजाभाऊ कढभाने, वैष्णवी नवरटक्के, सुषमिता जयभावे आदी प्रशिक्षकांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आपल्या दिवसभराच्या सत्रात शेतकर्‍यांना सखोल मार्गदर्शनात केले.
प्रशिक्षणाचा विशेष भाग म्हणून शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिक प्रकल्पांची शिवार फेरी घडवून आणण्यात आली. यामध्ये आधुनिक फळबाग व्यवस्थापन, गोशाळा प्रकल्प, रेशीम उद्योग केंद्र, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आणि इतर पूरक कृषी व्यवसायांची माहिती प्रत्यक्ष पाहून घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे केवळ सैद्धांतिक ज्ञानच नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली.
प्रशिक्षणानंतर शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. विशेषतः सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मिती, फळबाग लागवड आणि पूरक कृषी व्यवसाय याबाबत त्यांनी मोठी उत्सुकता दर्शविली. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गावात आणि शेतात हे प्रकल्प राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीची नवी दृष्टी मिळाली असून उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि पर्यावरणपूरक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. ग्लोबल विकास ट्रस्टच्या या उपक्रमामुळे ग्रामीण विकास, शेतकरी सक्षमीकरण आणि आत्मनिर्भर गाव निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. अशा प्रशिक्षणांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यास निश्चितच मदत होणार आहे असे प्रतिपादन समारोप प्रसंगी डॉ अस्वले यानी केले. यावेळी संस्थापक मयांक गांधी याच्याशी संवाद साधला. यावेळी त्यानी 25 लाख वृक्षारोपण उपक्रमात सहभाग घेण्याचे आणि निसर्गाचा समतोल राखण्याचे आवाहन केले. समारोप कार्यक्रमात शेतकर्‍यांना प्रमाणपत्र वाटप केले. या प्रकल्पा साठी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ धनंजय मेनकुदळे, सचिव राजू जोशी पुढील वर्षाचे अध्यक्ष अनिल मदनसुरे, सचिव शिवशंकर व्हंडरे, सोमशंकर महाजन, डॉ अतुल बिराजदार यांनी पुढाकार घेतला.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top