धाराशिवच्या योगपटूंनी जागतिक स्तरावर फडकवला भारताचा तिरंगा; सतीश साबळे ठरले वर्ल्ड चॅम्पियन.
धाराशिव : अहमदाबाद येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या योगपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत भारतासह जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू सतीश साबळे यांनी वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.

योगासन भारत यांच्या अधिपत्याखाली, गुजरात राज्य योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने तसेच केंद्र शासनाच्या सहकार्याने या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील नामांकित योगपटूंमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धाराशिवच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

सध्या सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये कार्यरत असलेले सतीश साबळे यांनी वरिष्ठ पुरुष गटातील ट्विस्टिंग प्रकारात जपान, इजिप्त, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, कजाकिस्तान आणि चाड आदी देशांच्या योगपटूवर मात करत वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत विश्वविजेतेपद मिळवले. जागतिक योगासन स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे ते पहिले योगपटू ठरल्याने त्यांच्या यशाचे विशेष कौतुक होत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल अजमेरा, सचिव स्वाती गडदे, उपाध्यक्ष गौरव बागल, डॉ. स्वाती लाकाळ, सहसचिव राजेश बिलकुले, योगेश थोरबोले, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, स्पर्धा विभाग प्रमुख रामकृष्ण खडके, संचालक प्रणाली जगदाळे, सीमा चौरे, अश्विनी जाधव, इंदुमती जाधव, रामेश्वर सावंत, वंदना इंगळे यांच्यासह जिल्ह्यातील योगप्रेमींनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सतीश साबळे यांच्या या सुवर्णमय कामगिरीमुळे धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्ह्यात सर्वत्र त्यांच्या यशाचा अभिमान व्यक्त केला जात आहे.
 
Top