धाराशिव (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रियदर्शनी मराठी प्राथमिक शाळा, धाराशिव येथे शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रोटरी क्लब धाराशिवच्या वतीने पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या 50 विद्यार्थ्यांचे स्कूल बॅग, गुलाबाचे फूल आणि मिठाई देऊन आनंदोत्सवात स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्रात 15 जून हा नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ मानला जातो. या दिवशी पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान पाहण्यासारखे होते. शाळेचा परिसर आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या सजावटी व स्वागत फलकांनी सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे गुलाबी फेटे बांधून, टिळा लावून व फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले.

यावेळी मुलांची शाळेबद्दलची भीती दूर व्हावी, शाळेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांनी मुलांशी संवाद साधत विविध खेळ व उपक्रम आयोजित केले. काही विद्यार्थ्यांचे पाटीपूजन व सरस्वती पूजन करून शुभारंभ करण्यात आला. तसेच पहिलीतील विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे घेऊन ते शाळेच्या भिंतीवर स्मृतीस्वरूप जतन करण्यात आले. याच कार्यक्रमात प्रियदर्शनी मराठी प्राथमिक शाळेत स्थापन करण्यात आलेल्या इंटरॅक्ट क्लबच्या अध्यक्ष व सचिव यांना इंटरॅक्ट क्लबचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

रोटरी क्लब धाराशिवच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबाचे फूल व मिठाई देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमधील शाळेची भीती दूर करणे, शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करणे, “शाळा म्हणजे आनंद आणि शिकण्याचे मंदिर“ हा संदेश देणे तसेच पालक व शाळा यांच्यात विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे हा होता. यावेळी रोटरी क्लब धाराशिवचे अध्यक्ष रणजीत रणदिवे, सचिव प्रदीप खामकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सगरे सर, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक तसेच रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम आनंद, उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या हास्याने भारावलेल्या वातावरणात पार पडला.

 
Top