धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दुरूस्तीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल महिन्यात मंजूर केलेल्या 5 कोटी रूपये निधीतून तात्काळ दुरूस्तीचे काम सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करावे, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.प्रतापराव सरनाईक यांना सोमवारी (दि.22) देण्यात आले.
अखिल भारतीय नाट्य परिषद धाराशिव शाखा अध्यक्ष तथा परिषदेचे नियामक मंडळ सदस्य श्री.विशाल शिंगाडे यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे पालकमंत्री सरनाईक यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर 12 एप्रिल 2026 रोजी आले असता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरावस्थेबाबत अवगत करून अडीच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नाट्य परिषदेचे धाराशिव शाखा अध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी केली होती. नाट्यगृहाची अवस्था पाहून उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी तात्काळ शासन आदेश काढून 5 कोटी रूपये मंजूर करण्यात आल्याचे सांगितले होते. परंतु या निधीचा अद्याप विनियोग झालेला नसल्याने हा निधी पडून आहे.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी मंजूर करण्यात आलेल्या 5 कोटी निधीतून दुरूस्तीचे काम सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करण्याची मागणी नाट्य परिषदेचे शाखा अध्यक्ष श्री.विशाल शिंगाडे यांनी केली. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग व मराठी भाषा मंत्री श्री.उदय सामंत यांना देखील निवेदन देऊन मागणीची दखल घेण्याबाबत अवगत करण्यात आले. त्यावर पालकमंत्री सरनाईक यांनी तात्काळ कार्यवाही करण्याबाबत नाट्य परिषदेच्या शिष्टमंडळास आश्वासित केल्याची माहिती श्री.शिंगाडे यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष (प्रशासन) सुगत सोनवणे, उपाध्यक्ष (उपक्रम) अंबिका आगळे , सहकार्यवाह अंकिता माने, शहराध्यक्ष विजय उंबरे, विजयकुमार आगळे उपस्थित होते.