धाराशिव (प्रतिनिधी)- काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो एक संवैधानिक विचार आहे. गांधी-नेहरू ते इंदिरा गांधी यांच्यापर्यंतच्या नेत्यांनी हा विचार प्राणपणाने जपला. आता हाच विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवून त्यांच्यात 'एक्सलन्स' (उत्कृष्टता) निर्माण करण्याचे काम 'विलासराव देशमुख सेंटर' करेल,“ असा विश्वास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला.
धाराशिव येथील परिमल मंगल कार्यालयात 'विलासराव देशमुख सेंटर'च्या पहिल्या शाखेचे उद्घाटन दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी आमदार उल्हासदादा पवार, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे आणि सेंटरचे प्रशांत पाटील उपस्थित होते. दिलीपराव देशमुख म्हणाले, “व्यक्तीच्या निधनानंतर तिची कीर्ती हळूहळू लोप पावते, परंतु विलासरावजींच्या बाबतीत हे चित्र वेगळे आहे. त्यांना जाऊन 14 वर्षे झाली, तरी त्यांचे कार्य आणि आठवणी अधिक प्रकर्षाने जपल्या जात आहेत. हे सेंटर त्याचेच जिवंत उदाहरण आहे. भारतीय समाज अधिक सक्षम करण्यासाठी काँग्रेसने दिलेले योगदान खूप मोठे आहे. ते योगदान आणि विचार पुढे नेण्यासाठी धाराशिवच्या तरुणांनी घेतलेला पुढाकार नक्कीच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे तथा सेंटरचे अध्यक्ष उल्हासदादा पवार यांनी विलासरावांच्या आठवणींना उजाळा देत सेंटरच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितलेल्या काही प्रसंगांनी उपस्थितांना भावूक केले, तर काही किस्स्यांनी सभागृहात हास्य पिकले. प्रमुख अतिथी संजय आवटे यांनी, विलासरावांच्या संसदीय कारकीर्दीचा गौरव केला. तसेच, सेंटरच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांसाठी विविध विषयांत 'फेलोशिप' सुरू करावी, अशी सूचना करत त्यात आपण स्वतः योगदान देण्याचे अभिवचन दिले.
या प्रसंगी विलासरावांचे ज्येष्ठ सहकारी नानासाहेब पाटील, शरदभाऊ सस्ते, आप्पासाहेब पाटील, विश्वास आप्पा शिंदे, माधवराव कुतवळ, रणजित दादा, विजयसिंह देशमुख, रावसाहेब पाटील सास्तूरकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, युवा साहित्य अकादमी नामांकित लेखक केतन पुरी आणि अभिनेता रोहित कोकाटे यांचाही विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र केसकर यांनी केले, तर आभार ॲड. अनिकेत देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सेंटरच्या अग्निवेश शिंदे, ॲड. राज कुलकर्णी, प्रा. सोमनाथ लांडगे, सुधीर सस्ते, प्रा. रवी निंबाळकर, प्रा. अजित शिंदे, डॉ. सायम रझवी, डॉ. सुधीर शिंदे, सुनील बडूरकर, शशिकांत वैराळे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
