धाराशिव (प्रतिनिधी)- विश्वासाने दुकानात ठेवलेले तब्बल 150 कट्टे सोयाबीन परस्पर विकून एका महिला शेतकऱ्याची तब्बल 6 लाख 92 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पाडोळी (आ.) येथे समोर आला आहे. जेव्हा या महिला शेतकऱ्याने आपल्या हक्काच्या सोयाबीनबाबत विचारणा केली, तेव्हा आरोपींनी तिला “हात-पाय तोडून जीवे मारू,” अशी धमकी दिली. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुंड कुटुंबातील तिघांविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमलता सुरेश नांदे (वय 49 वर्षे, मूळ रा. राजे बोरगाव, ता. जि. धाराशिव, सध्या रा. कृपा हॉटेलजवळ, अंबाजोगाई रोड, लातूर) यांची पाडोळी (आ.) शिवारात शेतजमीन आहे. 2022 ते मार्च 2025 दरम्यान त्यांच्या शेतात निघालेले एकूण 217 कट्टे सोयाबीन त्यांनी पाडोळी येथील दिलीप कुंभार यांच्या दुकानात सुरक्षिततेसाठी ठेवले होते. या दुकानाच्या चाव्या त्यांनी विश्वासाने आरोपी मारुती गुंड यांच्याकडे सोपवल्या होत्या.

फिर्यादी हेमलता नांदे यांनी विश्वासाने दिलेल्या चावीचा गैरफायदा घेऊन आरोपींनी नांदे यांच्या संमतीशिवाय दुकानातून एकूण 217 कट्ट्यांपैकी 150 कट्टे सोयाबीन (अंदाजे किंमत 6 लाख 92 हजार रुपये) परस्पर बाजारात विकून टाकले. 6 जून 2026 रोजी दुपारी 1:00 वाजण्याच्या सुमारास तसेच त्यापूर्वी हा सर्व फसवणुकीचा प्रकार घडला. आपल्या सोयाबीनची परस्पर विक्री झाल्याचे लक्षात आल्यानंतर हेमलता नांदे यांनी आरोपींकडे पैशांची आणि सोयाबीनची विचारणा केली. मात्र, आरोपींनी पैशांचे हिशोब देण्याऐवजी नांदे यांना अत्यंत उद्धटपणे हुसकावून लावले. “जर पुन्हा सोयाबीनचे पैसे मागितले, तर हात-पाय तोडून जीवे ठार मारू,” अशी थेट धमकीच या आरोपींनी महिला शेतकऱ्याला दिली.

अखेर या मोठ्या फसवणुकीनंतर हेमलता नांदे यांनी 21 जून 2026 रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या प्रथम खबरीवरून पोलिसांनी पाडोळी येथील खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. मारुती हरीभाऊ गुंड, धनंजय मारुती गुंड, आबासाहेब मारुती गुंड (सर्व रा. पाडोळी आ., ता. जि. धाराशिव) या तिन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(2), 316(2), 351(2)(3) आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. बेंबळी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 
Top