धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत लोहारा परिसरात अवैध जुगार अड्ड्यांवर नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली.  यामध्ये 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण 9 लाख 38 हजार 160 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक रीतु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.परि. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना प्राप्त झालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे लोहारा येथील काणेगाव रोड तसेच माकणी चौक परिसरातील शंभूराजे हार्डवेअर येथे अवैधरित्या सुरू असलेल्या तीन पत्ती (तिरट) जुगार अड्ड्यांवर पथकाने एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे तसेच पथकातील अंमलदार व चालक यांनी सहभाग घेतला. सदर कारवाईत 13 संशयित निष्पन्न झाले असून, त्यापैकी 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर 1 संशयित फरार आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, 1887 अन्वये लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयितांकडून जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन, एक चारचाकी वाहन, सहा दुचाकी वाहने व इतर साहित्य एकूण 9 लाख 38 हजार 160 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धाराशिव जिल्ह्यात अवैध जुगार, मटका, हातभट्टी दारू,अवैध मद्यविक्री, अमली पदार्थांची तस्करी व विक्री तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध पोलीस प्रशासनाकडून सातत्याने प्रभावी कारवाया सुरू असून, अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 
Top