धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील 1872  उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.

अपर जिल्हादंडाधिकारी,धाराशिव यांनी जारी केलेल्या आदेशानुसार परीक्षा काळात केंद्र परिसरातील शांतता,सुव्यवस्था आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी तसेच परीक्षार्थींना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

ही परीक्षा 31 मे 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे.जिल्ह्यातील श्रीपतराव भोसले हायस्कूल,पहिला मजला, मेन रोड धाराशिव पार्ट-ए,श्रीपतराव भोसले हायस्कूल,पहिला मजला, मेन रोड धाराशिव पार्ट-ब,श्रीपतराव भोसले हायस्कूल (अण्णा ई टेक्नो), मेन रोड धाराशिव पार्ट-ए,श्रीपतराव भोसले हायस्कूल (अण्णा ई टेक्नो), मेन रोड धाराशिव पार्ट-ब,रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,नवीन इमारत,मेन रोड,धाराशिव,जिल्हा परिषद कन्या प्रशाला,शहर पोलीस स्टेशनसमोर,धाराशिव तसेच रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, जुनी इमारत,मेन रोड,धाराशिव येथे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या आदेशानुसार परीक्षा केंद्र परिसरात घोषणाबाजी,गोंधळ अथवा शांततेस बाधा पोहोचवणारी कोणतीही कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,पानटपऱ्या,टायपिंग सेंटर,एसटीडी बूथ,संगणक केंद्रे आणि इंटरनेट कॅफे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन,फॅक्स,ई-मेल सुविधा, रेडिओ,इंटरनेट साधने,संगणक, कॅलक्युलेटर अथवा तत्सम उपकरणे घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.याशिवाय कोणत्याही वाहनांना परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.परीक्षेशी संबंध नसलेल्या व्यक्तींना केंद्रात प्रवेशबंदी करण्यात आली असून केवळ परीक्षा केंद्रावरील अधिकारी-कर्मचारी, शासकीय कामावरील कर्मचारी, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,कर्मचारी आणि परीक्षार्थी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षार्थींच्या नातेवाईकांनाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान,परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली असून हे आदेश 31 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

 
Top